प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक कुकू कोहली यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. १९९१ मध्ये त्यांनी दिग्दर्शित केलेला फुल और काँटे हा सिनेमा अजय देवगणला स्टार बनवणारा चित्रपट ठरला होता. वयाच्या ७७ व्या वर्षी कुकू कोहली यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांची प्राणज्योत मालवली. कुकू कोहली यांचे जवळचे मित्र आणि चित्रपट दिग्दर्शक अशोक पंडित यांनी ही माहिती दिली आहे.
अशोक पंडित काय म्हणाले?
कुकू कोहली हे आजारी वगैरे काहीही नव्हते. मात्र त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली. कुकू कोहली हे इंडियन फिल्म अँड टेलिव्हिजन डायरेक्टर्स असोसिएशनचे सरचिटणीस म्हणूनही काम पाहात होते. त्यांच्या निधनच्या बातमीने बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे.
विविध चित्रपटांचं दिग्दर्शन
१९९१ मध्ये आलेला फुल और काँटे हा चित्रपट कुकू कोहली यांच्या फिल्मी करिअरमधला महत्त्वाचा चित्रपट आहे. यातून त्यांनी अजय देवगण आणि मधु या दोघांनाही ब्रेक दिला होता. तसंच कुकू कोहली यांनी जुल्मी, अनाडी नंबर १, हकीकत, सुहाग, ये दिल आशिकाना या चित्रपटांचंही दिग्दर्शन केलं आहे. वो तेरा नाम था हा त्यांनी दिग्दर्शित केलेला अखेरचा चित्रपट ठरला. कुकू कोहली यांनी चित्रपटसृष्टीत अनेक चित्रपटांचं दिग्दर्शन केलं होतं. त्यांच्या निधनाच्या वृत्तामुळे हिंदी चित्रपटसृष्टी हळहळली आहे.
फुल और काँटेमधली अजय देवगणची एंट्री आजही चर्चेचा विषय
कुकू कोहली यांनी १९९१ मध्ये ‘फूल और काँटे’ या अॅक्शन थ्रिलर चित्रपटातून दिग्दर्शनाच्या क्षेत्रात पदार्पण केले. या चित्रपटातून अजय देवगणने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. मधू, अरुणा इराणी यांच्यासह अनेक कलाकारांच्या भूमिका असलेल्या या हिट चित्रपटातील अजय देवगणचा एन्ट्री सीन आजही प्रसिद्ध आहे. या दृश्यात तो दोन धावत्या मोटारसायकलींवर एक-एक पाय ठेवून उभा असल्याचे पाहायला मिळलं होतं. कुकू कोहली यांनी दिग्गज चित्रपट दिग्दर्शक राज कपूर यांच्या मार्गदर्शनाखाली बॉलिवूडमध्ये प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी राहुल रवैल यांना सनी देओलच्या दोन गाजलेल्या चित्रपटांसाठी असिस्ट केलं. बेताब आणि अर्जुन या दोन्ही चित्रपटांसाठी त्यांनी असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम पाहिलं होतं.

१९९० मध्ये अरुणा इराणींशी विवाह
कुकू कोहली यांनी रीटा कोहली यांच्याशी विवाह केला होता. रीटा आणि कुकू यांना दोन मुले आहेत, ज्यांची नावं पूजा कोहली आणि दिग्दर्शिका करिश्मा कोहली अशी आहेत. करिश्मा कोहली यांनी २०२२ मध्ये प्रदर्शित झालेल्या माधुरी दीक्षित अभिनीत ‘द फेम गेम’ या नेटफ्लिक्सवरील मिस्ट्री फॅमिली ड्रामा मालिकेचे सह-दिग्दर्शन केले होते. कुकू कोहली यांनी १९९० मध्ये अभिनेत्री अरुणा इराणी यांच्याशी विवाह केला. अरुणा इराणी या त्यांच्या द्वितीय पत्नी आहेत.
