Kuku Kohli Aruna Irani Love Story : बॉलीवूडचे लोकप्रिय दिग्दर्शक कुकू कोहली यांचं ७७ व्या वर्षी निधन झालं. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांची प्राणज्योत मालवली. कुकू कोहली यांनी ‘फूल और कांटे’, ‘कोहराम’, ‘सुहाग’, ‘हकीकत’, ‘जुल्मी’, ‘अनाडी नंबर १’ असे अनेक सुपरहिट चित्रपट बॉलीवूडला दिले. त्यांनीच अजय देवगणला इंडस्ट्रीत लाँच केलं होतं. कुकू कोहलींच्या निधनाने बॉलीवूडवर शोककळा पसरली असून त्यांच्या पत्नी ज्येष्ठ अभिनेत्री अरुणा इराणी यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

अरुणा इराणी व कुकू कोहली यांना मुलं नाहीत. कुकू कोहली यांच्या त्या दुसऱ्या पत्नी होय. त्यांना पहिल्या पत्नीपासून दोन मुली आहेत. एका मुलाखतीत अरुणा इराणी यांनी कुकू कोहलींबरोबरची त्यांची लव्ह स्टोरी सांगितली होती. कुकू विवाहित आहेत हे माहीत असूनही आपण त्यांच्या प्रेमात पडल्याची कबुली त्यांनी दिली होती. तसेच लग्नानंतर दोघांनी मूल होऊ न देण्याचा निर्णय का घेतला? त्याबद्दलही त्या व्यक्त झाल्या होत्या.

ते मला सेटवर बोलवायचे आणि बसवून ठेवायचे – अरुणा इराणी

‘झूम’ शी बोलताना अरुणा इराणींनी सांगितलं त्या आणि कुकू कोहली आधी एकमेकांचा तिरस्कार करायचे. “’कोहराम’ सिनेमा करताना मी कुकुजींना भेटले. तेव्हा मी घर चालवण्यासाठी खूप चित्रपट करत होते पण त्या फारशा चांगल्या भूमिका नव्हत्या. मी मद्रासमध्ये माझ्या चित्रपटांमध्ये खूप व्यग्र होते. त्या वेळी कुकुजींनी मला माझ्या एका महिन्याच्या तारखा विचारल्या, पण मी त्यांना सांगितलं की मी चित्रपट करू शकत नाही. कुकुजी रागावले, पण आम्ही एकत्र काम करत राहिलो. मी नकार दिल्याने काहीवेळा माझं काम नसतानाही ते मला फोन करून सेटवर बोलवायचे त्यामुळे मला खूप राग यायचा.”

मला कुकू कोहली अजिबात आवडायचे नाहीत – अरुणा इराणी

त्या पुढे म्हणाल्या, “कधीकधी ते मला दिवसभर सेटवर बसवून ठेवायचे आणि मग एक शॉट घ्यायचे, त्यामुळे आमच्यात भांडणं व्हायची. मला कुकूजी अजिबात आवडायचे नाही आणि त्यांनाही माझ्यावर राग होताच. पण नंतर काय झालं कुणास ठाऊक ते माझ्याशी नम्रपणे वागू लागले, मग आम्ही मित्र झालो. मग त्यांनी माझ्या तारखा अॅडजस्ट करायला सुरुवात केली आणि याचदरम्यान आम्ही प्रेमात पडलो.”

kuku-kohli-passes-away-aruna-irani
कुकू कोहली व अरुणा इराणी (फोटो- सोशल मीडिया)

लग्नाची माहिती लपवून ठेवण्याचा आणि मुलं होऊ न देण्याचा निर्णय का घेतला, असं अरुणांना विचारण्यात आलं. आमच्या लग्नाबद्दल कोणालाही सांगितलं नाही कारण ते आधीच विवाहित होते, असं उत्तर त्यांनी दिलं. “मी एका विवाहित पुरुषाशी लग्न केलंय, ही गोष्ट कोणालाही माहीत नव्हती. त्यांच्या पत्नीचे वर्षभरापूर्वी आजाराने निधन झाले होते,” असं अरुणा इराणी कुकू म्हणाल्या होत्या.

पतीच्या पहिल्या लग्नाबद्दल माहीत होतं – अरुणा इराणी

“मला माझ्या पतीच्या पहिल्या लग्नाबद्दल कल्पना नव्हती, अशी बातमी का पसरवली गेली ते मला माहीत नाही. त्यांची पत्नी मुलींबरोबर सेटवर यायची, त्यामुळे मला त्यांच्याबद्दल माहीत होतं. लग्न करण्याचा निर्णय आम्हा दोघांसाठी खूप कठीण होता. खरं तर बायका, नेहमी पतीच्या आयुष्यात आलेल्या दुसऱ्या महिलांना शिव्या घालतात. पण तुझ्या आनंदाला मी जबाबदार नाही, तो तुझा नवरा आहे. आधी त्याला थांबव, त्याने असं का केलं ते विचार. मी तुमचं घर तोडायला अफेअर थोडीच केलं. त्यांच्या नात्यात तिसरी व्यक्ती येऊच कशी शकते, हे फक्त त्या नवरा किंवा बायकोलाच माहीत,” असं अरुणा इराणी यांनी म्हटलं होतं.

अरुणा इराणी व कुकू कोहलींनी मूल का होऊ दिलं नाही?

“विवाहित पुरुषाशी लग्न करणं सोपं नाही. याच कारणामुळे मी आई झाले नाही. कारण जे मी सहन करतेय ते फक्त मीच सहन करू शकते. मी सतत काळजीत असते ते ठीक आहे, पण माझ्या मुलाने ‘पप्पा कुठे आहे?’ असं विचारलं तर मी त्याला काय उत्तर देऊ? तो या सगळ्यात (कुकू कोहली) अडकेल. समजा माझ्या मुलाला मध्यरात्री काही झालं तर मी त्याला कॉलही करू शकत नाही. म्हणूनच मला मूल असावं असं कधीच वाटलं नाही. जे मी सहन केलंय ते दुःख मी माझ्या बाळाला नको,” असं अरुणा इराणी म्हणाल्या होत्या.