Kumar Gaurav and Vijayta Pandit : १९८१ मध्ये प्रदर्शित झालेला ‘लव्ह स्टोरी’ हा चित्रपट त्या काळातील सर्वात मोठ्या हिट चित्रपटांपैकी एक होता. या चित्रपटाने कुमार गौरव आणि विजयता पंडित यांना रातोरात स्टार बनवलं. पडद्यावरील या दोघांची अप्रतिम केमिस्ट्री प्रेक्षकांना इतकी आवडली की, या जोडीची सर्वत्र चर्चा सुरू झाली. चित्रपटाच्या यशाबरोबरच या दोघांमधील जवळीकही वाढू लागली आणि लवकरच त्यांच्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले.

विजयता पंडितने अनेक मुलाखतींमध्ये सांगितलंय की, शूटिंग दरम्यान ते दोघे एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले होते. कुमार गौरवने तिच्याशी लग्न करणार असं वचनही दिलं होतं. दोघेही आपल्या नात्याबद्दल खूप गंभीर होते आणि एकत्र संसार करायच्या गोष्टी करायचे. एकेदिवशी गौरवची बायको व्हायचं स्वप्न विजेता पाहत होती.

दोघांच्या नात्याला कुटुंबाचा होता विरोध

‘लहरें रेट्रो’ला दिलेल्या एका मुलाखतीत विजयता पंडितने दावा केला होता की, कुमार गौरवचे वडील आणि दिग्गज अभिनेते-निर्माते राजेंद्र कुमार या नात्याच्या विरोधात होते. राजेंद्र कुमार यांची इच्छा होती की त्यांच्या मुलाचं लग्न एखाद्या मोठ्या किंवा प्रतिष्ठित कुटुंबात व्हावं. कुमार गौरवबरोबरच्या नात्यामुळे तिला चित्रपटसृष्टीत काम मिळण्यात अडचणी येऊ लागल्या आणि याचा थेट परिणाम तिच्या करिअरवर झाला, असं विजयताने म्हटलं होतं.

विजयता पंडितच्या मते, गौरव आपल्याशीच लग्न करेल, असा तिला विश्वास होता. पण अचानक सगळं काही बदललं. कोणतीही पूर्वकल्पना न देता कुमार गौरवने संजय दत्तची बहीण नम्रता दत्तशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. हे कळताच विजेताला मोठा धक्का बसला. त्यातून सावरायला खूप वेळ लागला, असंही विजेताने म्हटलं होतं.

विजयता पंडितने म्हटलं होतं की, राजेंद्र कुमार यांनी आमचं नातं स्वीकारलं नाही. गौरव आपल्या वडिलांचा शब्द मोडू शकला नाही, त्यामुळे आमचं नातं संपलं. हे सर्व दावे विजयताने केले होते. कुमार गौरवने मात्र विजेताबरोबरच्या नात्यावर आजपर्यंत कधीच कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.

रीमा कपूर यांच्याबरोबर जोडलं गेलेलं कुमार गौरवचं नाव

नम्रता दत्तबरोबर लग्न करण्यापूर्वी कुमार गौरवचं नाव राज कपूर यांची मुलगी रीमा कपूरशीही जोडलं गेलं होतं. दोघांचा साखरपुडाही झाला होता, पण काही कारणास्तव हे नातं लग्नापर्यंत पोहोचू शकलं नाही आणि साखरपुडा मोडला. यानंतर कुमार गौरवच्या आयुष्यात नम्रता दत्त आली आणि दोघांनी लग्न केलं.

रीमाबद्दल विजयता पंडितने भाष्य केलं होतं. गौरव व रीमाच्या साखरपुड्याला विजेताने हजेरी लावली होती. साखरपुड्यानंतर गौरव आपल्याला भेटायचा, लग्नाचं वचन द्यायचा आणि त्याच काळात त्याची नम्रता दत्तबरोबर जवळीक वाढली होती, असा दावा विजयताने केला होता. रीमा व गौरवचं नातं तुटण्याशी आपला काही संबंध नसल्याचंही विजेताने स्पष्ट केलं होतं.

कुमार गौरवने नम्रता दत्तबरोबर संसार थाटला

कुमार गौरवने अभिनेता संजय दत्तची बहीण नम्रता दत्तशी लग्न केलं आणि हळुहळू इंडस्ट्रीपासून दूर गेला. कुमार गौरव आणि नम्रता यांना दोन मुली आहेत.

विजयता पंडितने केली दोन लग्नं

दुसरीकडे विजयता पंडितने पहिलं लग्न चित्रपट दिग्दर्शक समीर मल्कान यांच्याशी केलं, पण ते नातं फार काळ टिकलं नाही. नंतर तिने प्रसिद्ध संगीतकार आदेश श्रीवास्तवशी दुसरं लग्न केलं. त्यांना अवितेश आणि अनिवेश श्रीवास्तव अशी दोन मुलं आहेत. सप्टेंबर २०१५ मध्ये आदेश श्रीवास्तव यांचं निधन झालं.