Kumar Sanu Vulgar Songs Movie Mafia Pressure: जादुई आवाजाचे गायक कुमार सानू यांनी ९०च्या दशकातील बॉलिवूड संगीतविश्व अक्षरशः गाजवलं. त्यांच्या रोमँटिक गाण्यांनी तरुणाईला प्रेमाची नवी भाषा दिली आणि त्यांची अनेक गाणी आजही तितकीच लोकप्रिय आहेत. मात्र, आपल्या आवाजाची आणि गाण्यांची ही वेगळी ओळख जपताना कुमार सानू यांना इंडस्ट्रीतील दबावालाही सामोरं जावं लागलं होतं. कुमार सानू यांनी ‘मूव्ही माफियां’च्या दबावामुळे अश्लील गाणी गायल्याचे सांगितले आहे.
‘झूम’ला दिलेल्या मुलाखतीत कुमार सानू यांनी संगीतविश्वातील आठवणी सांगितल्या आहेत. या काळामध्ये जबरदस्त सुपरहिट गाणी रिलीज झाली असली तरी त्यावेळी गायकांवर दबाव असल्याचे कुमार सानू यांनी कबूल केले. रोमँटिक गाण्यांसाठी लोकप्रिय असलेल्या कुमार सानू यांना त्यांच्या इच्छेविरोधात जाऊन काही गाणी गावी लागली. त्यांनी अश्लील किंवा मर्यादा ओलांडणारी गाणी गाणं नेहमीच टाळण्याचा प्रयत्न केला. मात्र, इंडस्ट्रीतील दबावामुळे काही वेळा तत्त्व पाळता न आल्याचं कुमार सानू यांनी सांगितलं.
माझ्यावर खूप दबाव होता – कुमार सानू
ते म्हणाले, “मी या इंडस्ट्रीमध्ये काम करताना माझी स्वतः अशी तत्त्व होती. मी माझ्या गाण्यांमध्ये अश्लीलता आणणार नाही, असं ठरवलं होतं. पण एक-दोन वेळा माझ्याच तत्त्वांविरोधात जाऊन काम करावं लागलं, कारण – त्यावेळी माझ्यावर खूप दबाव होता. ही काही गाणी गायली नाहीत तर पुढे काही गोष्टी होणार नाहीत. त्यामुळे मला ती गाणी गाणं खूप गरजेचं वाटलं होतं,”
पुढे कुमार सानू म्हणाले, “एक-दोन वल्गर गाणी गायली. मी ती गायची नाहीत, ठरवलं होतं. पण काही वेळा तडजोड करावी लागते. जसं की ‘राज गया तबला तबेले में…’, हे अशा प्रकारचं गाणं होतं. पण याव्यतिरिक्त मी नेहमीच स्पष्टपणे अश्लील म्हणता येतील अशी गाणी टाळली आहेत आणि आजही टाळतो. मी आजपर्यंत या तत्त्वावर ठाम राहिलो आहे. त्यामुळे माझं अनेकदा नुकसानही झालं आहे, पण मला त्यानं काही फरक पडत नाही,”
कुमार सानू यांनी यावेळी इंडस्ट्रीतील दबावाबद्दलही भाष्य केलं. त्यांनी या दबावाचा उल्लेख ‘मूव्ही माफिया’ असा केला. “माझी कधी इतर गायकांशी स्पर्धा नव्हती, पण काही मूव्ही माफियांचा दबाव होता. तरीही काही गाणी नाकारल्यामुळे त्याचा व्यावसायिक कारकिर्दीवर त्याचा परिणाम झाला. मात्र, मी जे काही निर्णय घेतले याबद्दल आजही कोणतीही खंत वाटत नाही,”
दाऊद इब्राहिमच्या पार्टीमध्ये कुमार सानू यांनी गायलेले गाणे
कुमार सानू हे १९९०च्या दशकातील सर्वाधिक लोकप्रिय पार्श्वगायकांपैकी एक होते. त्यांनी ‘मेरा दिल भी कितना पागल है’, ‘तुम मिले दिल खिले’, ‘अब तेरे बिन’, ‘दो दिल मिल रहे हैं’ आणि ‘आँख है भरी भरी’ अशी अनेक सुपरहिट गाणी गायली आहेत. दरम्यान, यापूर्वी लल्लनटॉपला दिलेल्या मुलाखतीमध्ये बॉलीवूडवर अंडरवर्ल्डचा दबाव असल्याचे सांगितले होते. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या एका दुबईतील पार्टीमध्ये सहभागी होत कुमार सानू यांनी त्याच्यासमोर गाणे गायले होते.
