Kumar Sanu On Dawood Ibrahim: बॉलीवूड आणि अंडरवर्ल्डचे कनेक्शन एकेकाळी खूप चर्चेत होते. आता त्याबद्दल लोकप्रिय गायक कुमार सानू यांनी भाष्य करत एक अत्यंत धक्कादायक खुलासा केला आहे. कुमार सानू यांनी दुबईतील एका पार्टीचा किस्सा सांगितला, जिथे ते थेट अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या अगदी समोर उभे राहून गाणी गात होते. “ती सेवा करावीच लागायची,” असे सांगत त्यांनी त्या काळातील चित्रपटसृष्टीवर असणाऱ्या अंडरवर्ल्डच्या वर्चस्वावर उघडपणे प्रकाश टाकला आहे.
बॉलीवूड आणि अंडरवर्ल्डबद्दल अनेक चर्चा व्हायच्या. त्यांच्या पार्ट्यांमध्ये कलाकारांना बोलावलं जायचं, तर तुम्हालाही बोलावलं होतं का? असं ‘द लल्लनटॉप’ला दिलेल्या मुलाखतीत कुमार सानू यांना विचारण्यात आलं. यावर उत्तर देताना ते म्हणाले, “हो, ते करावंच लागायचं. थोडीफार सेवा करावी लागायची. पण मी कधीही पैसे घेतले नाहीत.”
कुमार सानू यांनी दाऊदसमोर गायलं होतं गाणं
कुमार सानू म्हणाले, “नदीमजी मला दुबईतील एका पार्टीत घेऊन गेले होते. दाऊदच्या नात्यातील एका लहान मुलीचा वाढदिवस होता. तिथे मी, मुन्नाजी आणि अनु मलिक, आम्ही सगळे उपस्थित होतो. अनु मलिक आम्हाला तिथे घेऊन गेला होता. दाऊद इब्राहिम तिथेच होता आणि मी त्याला खूप जवळून पाहिलं होतं. तो थेट माझ्या समोर बसला होता.”
पुढे ते म्हणाले, “मी काम संपल्यानंतर कुठल्याही पार्ट्यांमध्ये जात नाही, मी या गोष्टी टाळतो. कारण मी दारू पित नाही, तर मग तिथे जाऊन मी काय करणार?”
कुमार सानू पुढे म्हणाले, “दाऊद त्याच्या कुटुंबाबरोबर समोर बसला होता आणि मी त्याने फर्माइश केलेली गाणी गात होतो. आम्ही स्टेजवर एकत्रच होतो. त्यानंतर आमची कधीही भेट झाली नाही आणि मी पुन्हा कधी गेलोही नाही.” तुम्हाला भीती वाटली होती का? असं विचारल्यावर कुमार सानू म्हणाले, “मला तेव्हा काही माहीतच नव्हतं. संगीत दिग्दर्शक मला तिथे घेऊन गेले होते, तो कोण आहे हे मला माहीत नव्हतं.”
वृत्तपत्रात फोटो आल्यावर भीती वाटली
कुमार सानू म्हणाले, “वाढदिवसाची पार्टी आहे आणि आपल्याला दुबईला जायचंय, फक्त एवढंच आम्हाला सांगण्यात आलं होतं. जेव्हा वृत्तपत्रात तो फोटो छापून आला, तेव्हा मला समजलं की मी हे काय करून बसलोय. त्यानंतर मला थोडी भीती वाटली. पण माझ्याबरोबर कोणताही वाईट प्रकार घडला नाही. एकदा एका माणसाचा फोन आला होता आणि त्याने पैशांची मागणी केली होती. माझ्याकडे पैसे नाहीत, काही काम असेल तर सांगा, असं मी त्याला स्पष्ट बोललो होतो. यामध्ये घाबरण्यासारखं किंवा लपवण्यासारखं काही नाही, आम्ही आमचं काम करत होतो.”
बॉलीवूड आणि अंडरवर्ल्डचे कनेक्शन
अंडरवर्ल्डच्या दबावाबद्दल बोलताना कुमार सानू म्हणाले, “त्या काळात चित्रपटांमध्ये जो पैसा लावला जायचा, माझ्या माहितीप्रमाणे तो सगला इथूनच यायचा. त्यामुळे जो पैसे देईल, त्याचंच राज्य असणार. म्हणूनच हे सगळे घडायचं. बाकी मी या गोष्टींचा कधी इतका खोलवर विचार केला नाही, मी फक्त माझ्या कामाशी काम ठेवायचो.”
