Kunal Kohli unique appeal to Maharashtra FDA Commissioner Tukaram Mundhe: एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली सध्या अन्नाची गुणवत्ता आणि सुरक्षेबाबत धडक कारवाई सुरू आहे. या पार्श्वभूमीवर दिग्दर्शक आणि चित्रपट निर्माते कुणाल कोहली यांनी तुकाराम मुंढेंना एक विशेष विनंती केली आहे. ही तपासणी मोहीम केवळ हॉटेल्स किंवा दुकानांपुरती मर्यादित न ठेवता भारतीय घराघरांतील स्वयंपाकघर आणि फ्रिजपर्यंत पोहोचवावी, असं मत त्यांनी व्यक्त केलं. अनेक वर्षांपासून साठवून ठेवलेले मुदत संपलेले पदार्थ बाहेर काढण्यासाठी घरातील स्वयंपाकघरांवर छापे टाकावेत, असं त्यांनी म्हटलंय.

कुणाल कोहली यांनी रविवारी, २३ ऑगस्ट रोजी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली. “मी तुकाराम मुंढे यांना विनंती करतो की त्यांनी भारतीय घरांमधील स्वयंपाकघरातील कपाट आणि फ्रिजवर छापे टाकावेत,” असं त्यांनी या पोस्टमध्ये लिहिलं.

भारतीय घरांमधील स्वयंपाकघरात अनेक एक्सपायरी डेट गेलेले पदार्थही ते चांगले दिसतात म्हणून ठेवले जातात. ते खराब झाले नाहीत किंवा त्याला बुरशी लागली नाही, तर ते वापरण्यायोग्य आहे, असं समजून ते वापरलेही जातात. मात्र असे पदार्थ वापरणं आरोग्यासाठी हानिकारक आहे. याच समस्येकडे कुणाल कोहलींनी लक्ष वेधलं. अशा अनेक वर्षांपासून साठवून ठेवलेल्या वस्तू स्वयंपाकघरातून बाहेर काढण्यात यावा, त्यासाठी छापेमारी करा, असं कुणाल कोहलींनी तुकाराम मुंढेंना म्हटलंय.

“भारतीय स्वयंपाकरघरांमध्ये तुम्हाला अनेक वर्षांपूर्वीच्या, मुदत संपलेल्या वस्तू सापडतील. विशेष म्हणजे त्या अतिशय टापटीप आणि सुरक्षितपणे जपून ठेवल्या जातात. दर महिन्याला त्या बाटल्या आणि पाकिटं पुसून स्वच्छ केली जातात आणि पुन्हा कपाटात किंवा फ्रिजमध्ये ठेवली जातात, पण त्यांचा वापर कधीच केला जात नाही,” असं कुणाल कोहली म्हणाले.

यानंतर या कुणाल कोहलींनी लोकांना एक चॅलेंज दिलं. एफडीए तपासणीची वाट पाहण्यापेक्षा लोकांनी स्वतःच्या स्वयंपाकघरातील कपाटांची आणि फ्रिजची स्वच्छता करावी. “चला, आपण सगळे मिळून तुकाराम मुंढे यांच्यासारखी आपल्या स्वयंपाकघरातील कपाटांची आणि फ्रिजची स्वच्छता करूया,” असं कुणाल कोहली म्हणाले.

दरम्यान, कुणाल कोहलींनी २००२ मध्ये ‘मुझसे दोस्ती करोगे’ या चित्रपटातून दिग्दर्शनात पदार्पण केलं होतं. त्यानंतर ‘हम तुम’, ‘फना’, ‘थोडा प्यार थोडा मॅजिक’ आणि ‘तेरी मेरी कहानी’ या चित्रपटांचे दिग्दर्शन केले. नंतर ‘नेक्स्ट एन्टि?’ या चित्रपटातून त्यांनी तेलुगू चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. ‘लाहोर कॉन्फिडेंशियल’ व ‘बॉबी और ऋषी की लव्ह स्टोरी’ या चित्रपटांसाठीही ते ओळखले जातात.