हिंदी सिनेसृष्टीत आजवर अशा अनेक हादरवून सोडणाऱ्या घटना घडल्या आहेत. अनेक घटनांमागची कारणं तर आजही समोर आलेली नाहीत. २०११ मध्येही बॉलीवूडमध्ये अशीच धक्कादायक घटना घडली होती. आधी बेपत्ता झालेल्या अभिनेत्रीची नंतर हत्या झाल्याचं समोर आलं. ही अभिनेत्री होती लैला खान. तिने राजेश खन्ना यांच्याबरोबरही काम केलं होतं.
बॉलीवूडमध्ये गेल्या काही वर्षांत अनेक दुर्दैवी घटना घडल्या आहेत. मात्र, अभिनेत्री लैला खान आणि तिच्या कुटुंबातील पाच जणांची हत्या हे आजही सर्वात धक्कादायक प्रकरणांपैकी एक मानलं जातं. २००८ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘वफा: अ डेडली लव्ह स्टोरी’ या चित्रपटात राजेश खन्ना यांच्याबरोबर काम केलेली लैला २०११ मध्ये कुटुंबासह अचानक बेपत्ता झाली होती. सुरुवातीला हे प्रकरण बेपत्ता व्यक्तींचं असल्याचं मानलं जात होतं; मात्र, तपास पुढे जाताच ती व तिचे कुटुंबीय बेपत्ता झाले नव्हते तर ती हत्या असल्याचं सत्य समोर आलं.
नेमकं काय घडलं झालं होतं?
मनी कंट्रोलच्या वृत्तानुसार लैला खान मुंबईत तिची आई सेलिना आणि कुटुंबातील इतर सदस्यांसह राहत होती. सेलिना यांचं परवेझ टाकबरोबर लग्न झालं होतं. हे त्यांचं तिसरं लग्न होतं. माजी मुंबई क्राइम ब्राँच अधिकारी अंबादास पोते यांच्या माहितीनुसार, कुटुंबात काही काळापासून तणाव निर्माण झाला होता. परवेझ टाक लैलाच्या अभिनय क्षेत्रातील कारकिर्दीवर नाराज होता आणि तिने चित्रपटांमध्ये काम सुरू ठेवण्यास त्याचा विरोध होता, असा दावा करण्यात आला. याशिवाय, कुटुंबाच्या मालमत्तेवरूनही मतभेद होते. परवेझने लैलाला कामासाठी दुबईला जाण्याचा सल्ला दिला होता. मात्र, तिने हा प्रस्ताव नाकारल्यानंतर कुटुंबातील संबंध आणखी बिघडल्याचं सांगितलं जातं.
परवेझ टाकने इगतपुरीतील कुटुंबाच्या फार्महाऊसवर वॉचमन म्हणून काम करण्यासाठी आपल्या एका साथीदाराची व्यवस्था केली होती. त्यानंतर त्याने लैलासह कुटुंबीयांना काही दिवस फार्महाऊसवर जाऊन राहण्याचा सल्ला दिला, असं म्हटलं जातं, पण लैला आणि तिचे कुटुंबीय परत न आल्याने सेलिना यांचे पहिले पती नादिर शाह यांनी बेपत्ता व्यक्तींची तक्रार दाखल केली. तपासादरम्यान पोलिसांचा संशय परवेझ टाकवर गेला. अखेर मुंबई पोलिस आणि जम्मू-काश्मीर पोलिसांच्या संयुक्त कारवाईत त्याला काश्मीरमधून अटक करण्यात आली.
कुटुंबातील सहा जणांची झाली हत्या
उल्लेख केलेल्या माध्यमाच्या वृत्तानुसार तपासाबाबत माजी क्राइम ब्राँच अधिकारी अंबादास पोते यांनी दिलेल्या माहितीनुसार, कुटुंबीय इगतपुरीतील फार्महाऊसवर गेले होते. तिथे त्यांनी संध्याकाळी बार्बेक्यूचा आनंद घेतला, एकत्र नृत्य केलं आणि त्यानंतर झोपण्यासाठी गेले. यानंतर परवेझ टाक आणि त्याच्या एका साथीदाराने लोखंडी रॉड आणि चाकूने कुटुंबीयांवर हल्ला केला. लैलाचा भाऊ इम्रान याने स्वतः जखमी होऊनही कुटुंबीयांना वाचवण्याचा प्रयत्न केल्याचं सांगितलं जातं. मात्र, तपास अधिकाऱ्यांच्या आरोपानुसार, हल्लेखोरांनी कोणालाही जिवंत न सोडण्याच्या उद्देशाने हल्ला सुरूच ठेवला. तपासाची दिशाभूल करण्यासाठी कुटुंबातील एका गाडीतून जम्मूला जाऊन ती गाडी तिथेच सोडण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला.
फार्महाऊसच्या जमिनीखाली पुरले होते मृतदेह
तपासाला आणखी धक्कादायक वळण मिळालं, जेव्हा पोलिसांनी इगतपुरीतील फार्महाऊसची झडती घेतली. कुटुंबातील सहा जणांचे मृतदेह स्विमिंग पूलसाठी खोदलेल्या खड्ड्यात पुरण्यात आले होते. सुरुवातीला या खड्ड्यात तीन मृतदेह ठेवण्यात आले. त्यानंतर त्यावर गाद्या आणि उशा टाकून पुन्हा मृतदेह ठेवण्यात आल्याचं तपासात समोर आलं. पावसामुळे खड्ड्यावर टाकलेली माती काही प्रमाणात खचली होती. यामुळे पोलिसांना संशय आला. त्यानंतर सहा तासांहून अधिक काळ खोदकाम केल्यानंतर पोलिसांना याबद्दल समजलं.
परवेझ टाकला झाली फाशीची शिक्षा
लैला खान आणि तिच्या कुटुंबातील पाच सदस्यांच्या हत्येचं रहस्य जवळपास १७ महिने लपून राहिलं. हत्येनंतर दशकाहून अधिक काळाने, २०२४ मध्ये मुंबई सत्र न्यायालयाने परवेझ टाकला फाशीची शिक्षा सुनावली. हे प्रकरण ‘रेअरेस्ट ऑफ द रेअर’ अर्थात अत्यंत दुर्मिळातील दुर्मिळ श्रेणीत येत असल्याचं न्यायालयाने म्हटलं. तसेच, या हत्या निर्दयी आणि पूर्वनियोजित पद्धतीने करण्यात आल्याचं न्यायालयाने नमूद केलं. मात्र, या प्रकरणातील एक गूढ अद्याप कायम आहे. अंबादास पोते यांच्या माहितीनुसार, परवेझ टाकला यामध्ये मदत करणाऱ्या त्याच्या साथीदाराला अद्याप अटक झाली नाही.
