Lalit Modi Interview Biopic with Ranveer Singh : बिझनेसमन आणि इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल)चे माजी आयुक्त ललित मोदी यांच्या आयुष्याबद्दल लोकांमध्ये नेहमीच कुतूहल राहिले आहे. ललित मोदी यांनी आयपीएलची सुरुवात करत क्रिकेट विश्वामध्ये नवा इतिहास रचला होता. मात्र, यानंतर झालेल्या घडामोडींमुळे त्यांना देश सोडावा लागला. ललित मोदी यांचे आयुष्य एखाद्या चित्रपटाच्या कथेपेक्षा कमी नाही, त्यामुळे ललित मोदी यांच्या जीवनावर आधारित बायोपिक तयार केला जाणार आहे. याबाबत त्यांनी स्वतः घोषणा केली असून यामध्ये स्टार अभिनेता रणवीर सिंहने मुख्य भूमिका साकारण्याची तयारी दाखवल्याचे वक्तव्य केले आहे.

बिझनेसमन ललित मोदी यांनी एएनआयला दिलेल्या मुलाखतीमध्ये आयपीएलची निर्मिती, अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमकडून मिळालेली धमकी आणि भारतीय राजकारण यावर मत मांडले आहे. ललित मोदी यांनी मुलाखतींचा सपाटा लावला असून यामध्ये ते अनेक गौप्यस्फोट करत आहेत. दरम्यान, ललित मोदी यांनी त्यांच्या आयुष्यावर आधारित चित्रपट येणार असल्याचे जाहीर केले आहे.

ललित मोदी यांच्या बायोपिकची घोषणा

मुलाखतीमध्ये ललित मोदी म्हणाले, “बायोपिकची तयारी सध्या सुरू आहे. चित्रपटाच्या कथालेखनाचे काम सुरू आहे. १०० हून अधिक इंटरव्ह्यू झाले आहेत. पूर्वी ‘सोनी’चे कामकाज पाहणाऱ्या स्नेहा रजनी यांच्या नेतृत्वाखाली एक संपूर्ण टीम यावर काम करत आहे. पण, सध्या केवळ लेखनाचे काम सुरू आहे,” अशी माहिती ललित मोदी यांनी दिली आहे.

ललित मोदी व रणवीर सिंहची लंडनमध्ये भेट

मुलाखतीमध्ये पुढे त्यांना चरित्रपटामध्ये कोणत्या कलाकाराने भूमिका साकारावी असे वाटते, याबद्दल विचारले. यावर ललित मोदींनी उत्तर दिले की, “रणवीर सिंहला माझी भूमिका साकारायची आहे. दोन ते तीन वर्षांपूर्वी तो स्वतः लंडनला मला भेटायला आला होता आणि यावेळी चित्रपटामध्ये काम करण्याबद्दल बोलला होता. मात्र, आता त्याला माझ्या चित्रपटामध्ये काम करण्यासाठी वेळ मिळाला पाहिजे, कारण तो आता मोठा झाला आहे. ‘धुरंधर’सारखा सुपरहिट चित्रपट त्याने दिला आहे. तो सर्वोत्तम काम करतो, याबद्दल कोणतीही शंका नाही,” असे ललित मोदी म्हणाले आहेत. पुढे त्यांनी रणवीर सिंहला भेटण्याचा किस्सा सांगितला.

रणवीरला आयुष्यामध्ये एक भूमिका करायची असेल तर ती ललित मोदी

ललित मोदी म्हणाले, “दोन वर्षांपूर्वी मला रणवीर सिंह खरंच माहिती नव्हता. मी दीपिका पादुकोणला ओळखत होतो, पण रणवीरला कधी भेटलो नव्हतो. मला एकाने रणवीर सिंह भेटण्यासाठी येत असल्याचे सांगितले आणि तो लंडनला आला. जर आयुष्यामध्ये कोणती एक भूमिका त्याला साकारायची असेल तर ती ललित मोदींची असल्याचे रणवीरने सांगितले होते. मी त्याला भूमिका करणारा का विचारले नव्हते, पण तो प्रभावी अभिनेता आहे यामध्ये कोणतीही शंका नाही, त्यामुळे अजूनही त्याला माझ्या बायोपिकमध्ये काम करायचे आहे का हे बघावे लागेल, असे वक्तव्य ललित मोदींनी केले आहे. त्यामुळे ललित मोदी यांच्या आयुष्यावर आधारित बायोपिक चित्रपट तयार झाला तर प्रमुख भूमिकेमध्ये रणवीर सिंह दिसण्याची शक्यता आहे.