Lalit Modi on Shah Rukh Khan KKR Team: इंडियन प्रीमियर लीग (IPL) आज जगातील सर्वात मोठी क्रीडा स्पर्धा बनली आहे, पण दोन दशकांपूर्वी याच्या यशासाठी क्रिकेट आणि बॉलिवूड एकत्र आणण्याची संकल्पना ललित मोदी यांनी मांडली होती. आयपीएलचे माजी अध्यक्ष ललित मोदी यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत, बॉलिवूडचा किंग खान म्हणजेच शाहरुख खानला ‘कोलकाता नाईट रायडर्स’ टीम खरेदी करण्यासाठी कसं तयार केलं, याची रंजक आठवण सांगितली आहे. जयपूरमधील एका आंतरराष्ट्रीय सामन्यादरम्यान शाहरुखची क्रेझ पाहून मोदींना ही कल्पना सुचली होती, परंतु सुरुवातीला शाहरुख ही टीम खरेदी करण्यास अजिबात तयार नव्हता, असा खुलासा मोदींनी केला आहे.

इंडियन प्रीमियर लीग ही जगातील सर्वात मोठ्या क्रीडा स्पर्धांपैकी एक आहे. आयपीएलमध्ये अब्जावधी रुपयांचे ब्रॉडकास्टिंग डील्स, स्पॉन्सरशिप असतात. चाहतेही दरवर्षी आयपीएलची मोठ्या आतुरतेने वाट पाहत असतात. पण दोन दशकांपूर्वी जेव्हा या स्पर्धेच्या संकल्पनेबद्दल चर्चा सुरू होती, तेव्हा आयपीएलचे संस्थापक ललित मोदी यांना माहित होतं की, ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी फक्त क्रिकेट पुरेसे नाही, तर त्यापेक्षा काहीतरी मोठं करावं लागेल.

‘ह्यूमन्स ऑफ बॉम्बे’शी बोलताना, आयपीएलचे माजी अध्यक्ष आणि बीसीसीआयचे माजी उपाध्यक्ष ललित मोदी यांनी, शाहरुख खानला आयपीएल टीमचा मालक बनण्यासाठी कसं तयार केलं, ती आठवण सांगितली. याच प्रयत्नांतून पुढे ‘कोलकाता नाईट रायडर्स’ (KKR) या आयपीएलमधील सर्वात लोकप्रिय टीमची निर्मिती झाली.

ललित मोदी यांच्यामते, जयपूरमधील एका आंतरराष्ट्रीय सामन्यादरम्यान शाहरुख खानला पाहून क्रिकेट चाहत्यांमध्ये जी प्रचंड क्रेझ निर्माण झाली होती, ते पाहूनच त्यांना ही कल्पना सुचली होती. “मी बीसीसीआयचा उपाध्यक्ष असताना शाहरुखला राजस्थानमधील एका सामन्यासाठी घेऊन गेलो होतो. जयपूरमध्ये खेळवला गेलेला तो पहिलाच आंतरराष्ट्रीय सामना होता. हे आयपीएल सुरू होण्याच्या वर्षभराआधी घडलं होतं. शाहरुख तिथे पोहोचताच प्रेक्षक अक्षरशः वेडे झाले होते. तो संपूर्ण सामना शाहरुखनेच गाजवला होता,” असं ललित मोदी म्हणाले. जयपूरमधील त्या सामन्यानंतर ललित मोदींना एक कल्पना सुचली. त्यांना वाटलं की, एक यशस्वी फ्रँचायझी लीग तयार करण्यासाठी क्रिकेट आणि बॉलीवूड एकत्र आणणं हे सर्वात फायद्याचं ठरू शकतं.

‘भारतात दोनच गोष्टी चालतात — क्रिकेट आणि बॉलीवूड’

आयपीएलच्या बिझनेस मॉडेलमागचा विचार स्पष्ट करताना मोदी म्हणाले की, त्यांना ही नवीन स्पर्धा यशस्वी करण्यासाठी टीव्हीवरील प्राईम-टाइम मालिका व शोशी स्पर्धा करावी लागणार होती. “भारतात दोनच गोष्टी चालतात, एक म्हणजे क्रिकेट आणि दुसरी बॉलीवूड. मी क्रिकेट विश्वाशी संबंधित पैसा आणि जाहिरातदारांना आधीच बीसीसीआयमध्ये आणलं होतं. पण टीव्हीवरील इतर उर्वरित जाहिराती या सासू-सून मालिका आणि बॉलीवूड संबंधित कार्यक्रमांकडे जात होत्या.”

आयपीएल यशस्वी होण्यासाठी रात्री ८ वाजताचा ‘प्राईम-टाइम’ स्लॉट मिळवणं अत्यंत महत्त्वाचं होतं, असंही ललित मोदी यांनी स्पष्ट केलं. “आयपीएल यशस्वी करण्यासाठी मला रात्री ८ ची वेळ हवी होती. मी देशातील काही सर्वात मोठ्या आणि लोकप्रिय टीव्ही शोजशी थेट स्पर्धा करत होतो. तोपर्यंत क्रिकेट हे रात्री खेळले जाणारे प्रॉडक्ट नव्हते. अगदी टी-२० वर्ल्ड कप देखील दिवसाच खेळवला जात असे. रात्रीच्या प्राईम-टाइमला हा इव्हेंट आयोजित करून मी खूप मोठी जोखीम घेत होतो.”

Lalit Modi sharing story about convincing Shah Rukh Khan to buy KKR IPL team in Marathi(1)
फोटो सौजन्य – एक्सप्रेस आर्काइव्ह

मोदींनी पुढे सांगितलं की या रणनीतीसाठी त्यांना अशा सेलिब्रेटी मालकांची गरज होती, जे पारंपरिक क्रिकेट चाहत्यांशिवाय इतर सर्वसामान्य प्रेक्षकांनाही मैदानाकडे आणि क्रिकेट पाहण्याकडे खेचून आणू शकतील.

शाहरुख खानला क्रिकेट आवडायचं नाही – ललित मोदी

शाहरुख खानबरोबर झालेल्या चर्चेची आठवण ललित मोदींनी सांगितली. शाहरुख सुरुवातीला टीम खरेदी करण्यास संकोच करत होता, कारण त्याला क्रिकेटमध्ये फारसा रस नव्हता. “टीमचा मालक होण्यासाठी शाहरुख खानपेक्षा उत्तम व्यक्ती कोण असणार? पण गंमत म्हणजे शाहरुखला क्रिकेट आवडत नव्हतं आणि त्याला क्रिकेट फारसं समजायचंही नाही. तो फुटबॉलचा चाहता आहे. जेव्हा मी त्याला आयपीएलची टीम विकत घेण्यास सांगितलं, तेव्हा तो थोडा घाबरला. तो म्हणाला, ‘मला क्रिकेट समजत नाही.’ त्यावर मी म्हणालो, ते तू माझ्यावर सोडून दे, मी तुला योग्य टीम आणि सगळी व्यवस्था करून देईन,” असं ललित मोदी म्हणाले.

शाहरुख खानला पैशांची होती काळजी

शाहरुखचा आणखी एक मुद्दा पैशांचा होता, असं ललित मोदींनी स्पष्ट केलं. “त्याने मला विचारलं, ‘समजा मी लिलावात टीम जिंकली, तर मला किती पैसे भरावे लागतील?’ मी त्याला सांगितलं की, डाऊन पेमेंट म्हणून २० कोटी रुपये द्यावे लागतील. त्यावर तो म्हणाला, ‘ही रक्कम तर खूप मोठी आहे.'”

नोकियाबरोबरची शाहरुख खानची डील

ललित मोदी म्हणाले, “त्या काळात ‘नोकिया’ नावाची एक मोबाईल बनवणारी कंपनी होती. शाहरुख खानला आपला ब्रँड अ‍ॅम्बेसेडर बनवण्यासाठी ते प्रचंड उत्सुक होते, पण शाहरुखला त्यात रस नव्हता. मी त्याच्या जाहिरातींच्या वैयक्तिक कामात हस्तक्षेप करू शकत नव्हतो. म्हणून मी नोकिया कंपनीला विचारलं की, जर शाहरुखने आयपीएल टीम खरेदी केली, तर तुम्ही त्याच्या टीमच्या जर्सीसाठी मुख्य स्पॉन्सर व्हाल का? मी त्यांना खात्रीने सांगितलं की शाहरुख स्वतः तुमचं शर्ट आणि टोपी वापरेल, आणि यासाठी तुम्ही २० ते २५ कोटी रुपये अ‍ॅडव्हान्स द्याल का? त्यावर नोकिया कंपनी लगेच तयार झाली.”

शाहरुखने मोफत खरेदी केली केकेआर टीम

या डीलचा नोकिया व शाहरुख दोघांनाही फायदा झाल्याचं ललित मोदींनी सांगितलं. “जर शाहरुखने टीम खरेदी केली, तर तो नोकियासाठी फायद्याचा सौदा होता. आणि नोकिया जर्सीसाठी स्पॉन्सर झाली, तर तो शाहरुखसाठी फायद्याचा सौदा होता. म्हणजेच एका अर्थी शाहरुखने ती टीम मोफतच खरेदी केली. दुपारी १२ वाजता शाहरुखने चेक लिहून दिला, आणि संध्याकाळपर्यंत नोकियाने ‘केकेआर’ला स्पॉन्सर करण्यासाठी दुसरा चेक लिहून दिला,” असं ललित मोदी म्हणाले.

शाहरुख खान व अभिनेत्री जुही चावला आणि उद्योगपती जय मेहता यांच्या संयुक्त मालकीची असलेली ‘कोलकाता नाईट रायडर्स’ (KKR) ही टीम पुढे जाऊन आयपीएलमधील सर्वात मोठी आणि लोकप्रिय टीम बनली. या टीमने आतापर्यंत अनेक वेळा आयपीएलचे विजेतेपद पटकावले आहे.