Lalit modi Sushmita sen relationship : बिझनेसमन ललित मोदी आणि अभिनेत्री सुष्मिता सेन यांच्या नात्याने काही वर्षांपूर्वी सोशल मीडियावर अक्षरशः खळबळ उडवली होती. २०२२ साली ललित मोदी यांनी सुष्मिताबरोबर खास फोटो शेअर केल्यानंतर त्यांच्या रिलेशनशिपची जोरदार चर्चा सुरू झाली होती. काही नेटकऱ्यांनी त्यांच्या नात्याला ट्रोल करत सुष्मिताला ‘गोल्ड डिगर’ असे म्हटले होते. यावर आता तब्बल चार वर्षांनंतर ललित मोदी यांनी मोठा खुलासा केला आहे. त्यांचे आणि सुष्मिताचे नाते पैशांमुळे नव्हे, तर वेगळ्याच कारणामुळे संपल्याचे त्यांनी सांगितले. तसेच सुष्मिताकडे पैशांची कमी नसून तिच्याकडे जगातील सर्वोत्तम डायमंड्स असल्याचेही ललित मोदी यांनी नमूद केले आहे.
सुष्मिता सेन माझ्यासाठी खूप खास – ललित मोदी
बिझनेसमन आणि आयपीएलचे संस्थापक ललित मोदी यांनी ‘ह्युमन्स ऑफ बॉम्बे’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये सुष्मिता आणि त्यांच्या नात्याच्या आठवणी सांगितल्या आहेत. तसेच त्यांचे नाते जाहीर केल्यानंतर काही कारणांमुळे ते संपल्याचेदेखील सांगितले. सोशल मीडियावर फोटो पोस्ट केल्यानंतर काय वाटले याबाबत ललित यांना विचारण्यात आले. यावर ललित मोदी म्हणाले, “सुष्मिता सेन माझ्यासाठी खूप खास होती. तिने माझ्यामध्ये खूप काही चांगले बदल केले, ज्यामुळे मी आज जे काही आहे ते तिच्यामुळेच आहे. ती नेहमीच माझ्यासाठी प्रिय व्यक्ती राहिली आहे आणि तिच्यासोबतच्या अनेक सुंदर आठवणी आहेत,” अशा भावना ललित मोदी यांनी व्यक्त केल्या आहेत.
सुष्मिता व ललित मोदींचे ‘लॉंग डिस्टन्स’ रिलेशन
त्याचबरोबर ललित आणि सुष्मिता यांचे रिलेशन का संपले याबाबत ललित म्हणाले, “त्यावेळी ती माझ्या आयुष्याचा महत्त्वाचा भाग होती. फक्त आमच्यामध्ये अंतर जास्त होते. आमचे रिलेशन ‘लॉंग डिस्टन्स’ असल्यामुळे आमचे नाते संपले. तिचे भारतामध्ये करिअर होते; तर माझे आयुष्य लंडनमध्ये होते. पण, सुष्मितासह असणारे नाते खूप खास आणि अनोखे होते. तिच्याबरोबर माझ्या खास आठवणी राहिल्या आहेत, ती अजूनही माझी खास मैत्रीण आहे,” असे ललित मोदींनी सांगितले आहे. सुष्मिता सेन ही प्रचंड आत्मविश्वास असलेली प्रभावी व्यक्ती आहे आणि तिची दिवसेंदिवस होणारी प्रगती पाहून अतिशय अभिमान वाटतो, असे देखील ललित मोदींनी म्हटले आहे.
सुष्मिताकडे जगातील सर्वोत्तम डायमंड्स
सोशल मीडियावर ललित मोदींसह असलेल्या नात्यामुळे सुष्मिता सेनला ‘गोल्ड डिगर’ म्हटले जात होते. पैशांसाठी श्रीमंत लोकांशी नाते जोडत असल्याचे म्हणत ट्रोल केले जात होते. यावर ललित मोदी यांनी स्पष्टच भूमिका मांडली आहे. ललित मोदी म्हणाले, “लोकांनी हे समजून घेतले पाहिजे की सुष्मिता सेन खूपच सुंदर आणि स्वतःच्या मेहनतीवर यश मिळवलेली महिला आहे. तिच्याकडे जगातील सर्वोत्तम डायमंड्स आहेत आणि ते तिने स्वतःच्या कमाईतून मिळवले आहेत. तिचे स्वतःचे डायमंड स्टोअर्सही आहेत, हे लोकांना माहिती नाही. ती आर्थिकदृष्ट्या खूप सक्षम आहे. तिने स्वतःच्या मेहनतीने पैसे कमावले आहेत,” असे म्हणत पैशांसाठी नाते ठेवत असल्याचे म्हणणाऱ्या ट्रोलर्सला ललित मोदींनी उत्तर दिले.
मी तिचा ‘कीप बॉयफ्रेंड – ललित मोदी
त्याचबरोबर रिलेशनमध्ये असताना सर्व खर्च सुष्मिता सेन करत असल्याचे ललित मोदींनी सांगितले. ते म्हणाले की, मी आणि सुष्मिता जेव्हा जेव्हा बाहेर जायचो, तेव्हा अनेकदा सर्व खर्च तीच करत असे. मला कधीच तिच्यासाठी पैसे द्यावे लागले नाहीत. त्यामुळे मीच तिचा ‘कीप बॉयफ्रेंड’ असल्यासारखे वाटायचे,” अशा आठवणी ललित मोदी यांनी सुष्मिता सेनबाबत सांगितल्या आहेत. तसेच “ती सुंदर व्यक्ती आणि खंबीर ‘सिंगल मदर’ आहे, तिची प्रगती पाहून मला आनंद होतो, तिचे नेहमी सगळे चांगलेच व्हावे,” अशा शुभेच्छा बिझनेसमन ललित मोदींनी एक्स गर्लफ्रेंड सुष्मिता सेनला दिल्या आहेत.
