Lara Dutta on Deepika Padukone: दीपिका पादुकोण बॉलीवूडमधील आघाडीची अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. आजपर्यंत तिचे अनेक सिनेमे गाजले आहेत. तिने बॉलीवूडमधील लोकप्रिय कलाकारांबरोबर प्रमुख भूमिकेत काम केले आहे. आता अभिनेत्री लारा दत्ताने दीपिकाबरोबर हाऊसफुल सिनेमात काम करण्याचा अनुभव सांगितला आहे. ती नेमकं काय म्हणाली आहे, हे जाणून घेऊ…
लारा दत्ताने नुकतीच एनडीटीव्हीला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने दीपिका पादुकोण तिच्या कामाप्रति किती समर्पित आहे, याबद्दल वक्तव्य केले. लारा दत्ता म्हणाली, “अनेकांना याबद्दल माहीत नाही. हाऊसफुल सिनेमाच्या शूटिंगदरम्यान दीपिका खूप आजारी पडली होती, तिला मलेरिया झाला होता, तिला खूप ताप आला होता, डॉक्टरांनी तिला औषधे दिली होती.”
“ती थरथरत होती”
पुढे ती म्हणाली, “ताप आल्यामुळे, अशक्तपणा आल्यामुळे ती थरथरत होती. दुसऱ्या दिवशी सकाळी आमचे शूटिंग होते. एकाच सीनमध्ये अनेक कलाकार होते. आजारी असतानाही ती सेटवर आली. तिला अशक्तपणा आला आहे हे कळत होते, पण ती प्रोफेशनल आहे. तिने तिचे काम केले. विशेष म्हणजे आजारी असतानाही तिने ते शूटिंग केले होते, तरीही तिने ते उत्तम केले होते.”
“ती लाजरी नव्हती, पण…”
लारा दत्ता असेही म्हणाली, “जेव्हा तुम्ही खूप आजारी असता किंवा अशक्तपणा आलेला असतो तेव्हा काम करणे, शूटिंग करणे किती अवघड असते हे मला माहीत आहे. फक्त ताप आला आहे किंवा सर्दी झाली होती असे नव्हते, तर तिला मलेरिया झाला होता.”
दीपिकाचे कौतुक करत लारा म्हणाली, “ती लाजरी नव्हती, पण कमी बोलत असे. तिला काय करायचे हे तिला माहीत असायचे. ती तिच्या कामाबाबत एकाग्र असते. जेव्हा प्रत्येक कलाकाराला नेमकं काय करायचं आहे हे माहीत असतं, ते त्याचं कौशल्य जेव्हा सेटवर दाखवतात, तेव्हा खऱ्या अर्थाने जादू घडते”, असे म्हणत लारा दत्ताने दीपिकाबरोबर काम करण्याचा अनुभव सांगितला.
दरम्यान, हाऊसफुल सिनेमाबद्दल बोलायचे तर हा चित्रपट १६ वर्षांपूर्वी प्रदर्शित झाला होता, ज्यामध्ये अक्षय कुमार, रितेश देशमुख, बोमन इराणी, अर्जुन रामपाल हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसले होते.
