Lara Dutta Drowning Experience Akshay Kumar: २००३ मध्ये प्रदर्शित झालेला ‘अंदाज’ सिनेमा तुम्हाला आठवतोय? या सिनेमामध्ये अक्षय कुमार, लारा दत्ता व प्रियांका चोप्रा प्रमुख भूमिकांत दिसल्या होत्या. राज कंवर यांनी या सिनेमाचे दिग्दर्शन केले होते; तर सुनील दर्शन यांनी सिनेमाची निर्मिती केली होती. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला होता.
लारा दत्ताने २००० मध्ये मिस युनिव्हर्स हा किताब जिंकला. त्यानंतर तिने २००३ मध्ये अंदाज या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले होते.
आता लारा दत्ताने एका मुलाखतीत या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान तिच्याबरोबर काय घडले होते, याचा खुलासा केला आहे. एशियन टेलिव्हिजन नेटवर्क कॅनडाला अभिनेत्रीने मुलाखत दिली. त्या मुलाखतीत तिने तिच्या करिअरमधील भीतीदायक अनुभव सांगितला.
अभिनेत्री म्हणाली, “चित्रपटात एक डान्स सीक्वेन्स आहे, ज्याचे शूटिंग समुद्रकिनाऱ्यावर झाले. त्यादरम्यान एक मोठी लाट आली. त्या लाटेबरोबर मी आणि अक्षय कुमार समुद्रात गेलो. मला पोहता येत नव्हते. त्यामुळे मी घाबरले आणि समुद्रात बुडू लागले होते. त्यावेळी लेदरचे कपडे घातलेले होते. दगड जसा पाण्यात खाली जातो, तशी मी जात होते. त्यावेळी अक्षय कुमारने मला धरले आणि किनाऱ्यावर आणले. मला हायपोथर्मिक शॉक (या स्थितीत शरीराचे तापमान खूप कमी होऊन, गंभीर अवस्था निर्माण होते) बसला होता. शूटिंग थांबवून, मला दवाखान्यात नेण्यात आले. या घटनेचा माझ्या मनावर खोल परिणाम झाला होता.”
लारा दत्ताने पुढे सांगितले की, जेव्हा ब्लू (Blue) या सिनेमाचं कास्टिंग सुरू होत. त्यावेळी अक्षय कुमारन निर्मात्यांना माझं नाव सुचवलं. या सिनेमात अनेक अंडरवॉटर सीन होते. जेव्हा मला पहिल्यांदा या चित्रपटाबद्दल विचारलं गेलं, त्यावेळी नकार देण्याचा माझा विचार होता. मी या सिनेमात काम करू शकत नाही, असं अक्षयला फोन करून सांगितलं. त्यावर अक्षय म्हणाला की, पोहायला शिक. ३० व्या वर्षी त्यानं मला डायव्हिंग शिकायला सांगितलं.”
अक्षयने सांगितल्यानुसार लारा दत्ता ३० व्या वर्षी पोहायला शिकली. तिने तिच्या भीतीवर मात केली आणि ‘ब्लू’सिनेमासाठी होकार दिला.
ब्लू सिनेमा अँटनी डिसूझा यांनी दिग्दर्शित केला होता. या सिनेमाच्या शूटिंगदरम्यानदेखील काही घटना घडल्या. लारा दत्ताने मुलाखतीत सांगितले की, खऱ्या शार्कबरोबर पाण्यात शूटिंग झाले. अक्षय कुमारने क्लायमॅक्सच्या शूटिंगदरम्यान मृत्यू जवळून बघितला. १५० फूट खोल पाण्यात बुडालेल्या जहाजाला अक्षयचे डोके आपटले. त्यामुळे तो जखमी झाला. डोक्यातून रक्त येत होते. तरीही शार्क असलेल्या त्या पाण्यातून तो वर येऊ शकला.
या चित्रपटात संजय दत्त आणि झायेद खान प्रमुख भूमिकांत होते. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर फार यशस्वी ठरला नाही.
