प्रियांका चोप्रा आणि लारा दत्ता यांनी २००० मध्ये आंतरराष्ट्रीय सौंदर्य स्पर्धा जिंकल्या आणि त्यानंतर लगेचच त्यांना बॉलीवूडमधून ऑफर्स येऊ लागल्या. प्रियांका आणि लारा या दोघींनीही अक्षय कुमारच्या ‘अंदाज’ चित्रपटातून हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. बघता बघता त्या बॉलीवूडच्या आघाडीच्या अभिनेत्री झाल्या. आता लाराने तेव्हाच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. त्या काळात अक्षयने माझी आणि प्रियांकाची खूप काळजी घेतली होती, असं लारा दत्ताने म्हटलंय. इतकंच नाही तर तिला आणि प्रियांकाला मार्गदर्शन करणारं कोणीही नव्हतं, पण अक्षयने कधीही त्या गोष्टीचा गैरफायदा घेतला नाही.

एका मुलाखतीत लाराने सांगितलं की पहिल्या चित्रपटाच्या बाबतीत ती खूप नशीबवान होती. तिने अक्षयला आपला “मित्र आणि मार्गदर्शक” म्हटलंय. “म्हाला सुरक्षित वाटतं, असं वातावरण तुमच्या आजूबाजूला असणं आणि तुमचे कोणत्याही प्रकारे शोषण होणार नाही याची खात्री असणं, ही खूप मोठी गोष्ट आहे. आमच्यासाठी तिथे आमची काळजी घेणारे लोक होते,” असं लारा दत्ता म्हणाली.

प्रियांका आणि तिला अक्षयने केलेल्या मार्गदर्शनाबद्दल लारा म्हणाली, “प्रियांका आणि मी एकाच वेळी इंडस्ट्रीत आलो होतो. अक्षयने पाहिलं की या दोन तरुण मुली डोळ्यांत स्वप्ने घेऊन आल्या आहेत, पण त्यांना दिशा दाखवणारं कोणीही नाही. त्याने कधीही आमच्या या परिस्थितीचा फायदा घेतला नाही. मला वाटतं की तो खूप हुशार आणि व्यवहारी माणूस आहे. त्याला या व्यवसायाची खडान् खडा माहिती आहे आणि काय यशस्वी होईल हे त्याला चांगलं समजतं. त्यामुळेच, करिअरची सुरुवात करण्यासाठी मला अक्षयच्या रूपाने एक भक्कम आधार मिळाला.”

अक्षय आणि प्रियांकाच्या नात्याबद्दलच्या चर्चा आणि वाद

‘अंदाज’ चित्रपटाचे निर्माते सुनील दर्शन यांनी यापूर्वी असं म्हटलं की, या चित्रपटानंतरच्या काळात अक्षय कुमार आणि प्रियांका चोप्रा एकमेकांच्या जवळ आले होते. त्यावेळी अक्षयचे ट्विंकल खन्नाशी लग्न झाले होते. सुनील दर्शन यांना त्यांच्या ‘बरसात’ चित्रपटामधून अक्षयला काढून टाकावं लागलं होतं, कारण ट्विंकलचा अक्षयने प्रियांकाबरोबर काम करण्याला विरोध होता.

‘बरसात’ चित्रपटाचं एक गाणं सूट केल्यानंतर त्यांनी अक्षयला चित्रपटातून बाहेरचा रस्ता दाखवला होता. ते म्हणाले, “मला अक्षय आणि त्याच्या पत्नीमधील वादाबद्दल समजलं होतं. मला सांगण्यात आलं की, ट्विंकलला प्रियांकाबद्दल काही समस्या होत्या. या इंडस्ट्रीत कधीकधी कलाकारांमधील जवळीक किंवा त्यांची जीवनशैली आड येते आणि मीडिया या गोष्टींना उचलून धरते, त्यामुळे निर्मात्याचे किती नुकसान होऊ शकते, याचा विचार कोणीही करत नाही.”

प्रियांका चोप्रा आता निक जोनासबरोबर संसार करत असून त्यांना मालती मेरी चोप्रा ही मुलगी आहे. दुसरीकडे, अक्षय आणि ट्विंकल यांच्या लग्नाला २५ वर्षे पूर्ण झाली आहेत. अक्षय आणि प्रियांका यांनी ‘मुझसे शादी करोगी’, ‘ऐतराज’, ‘वक्त’ आणि इतर काही चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं आहे.