Lara Dutta shared dance video with her daughter Saira Bhupathi: लारा दत्ता ही बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री आहे. २००० ला तिने मिस युनिव्हर्स हा खिताब जिंकत सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. त्यानंतर तिने २००३ ला ‘अंदाज’ या सिनेमातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटासाठी तिला फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट पदार्पण हा पुरस्कार मिळाला होता.
‘अंदाज’ सिनेमानंतर २००४ ला प्रदर्शित झालेल्या ‘मस्ती’ या सिनेमात लारा प्रमुख भूमिकेत दिसली होती. त्यानंतर ती २००५ ला ‘नो एन्ट्री’, २००६ ला ‘भागम भाग’ आणि २००७ ला ‘पार्टनर’ या सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत दिसली होती. तिचे हे सिनेमे प्रचंड गाजले. या विनोदी सिनेमांतून तिला प्रचंड लोकप्रियता मिळाली. ‘पार्टनर’ आणि २०१० ला प्रदर्शित झालेल्या ‘भागम भाग’ या सिनेमांतील तिच्या विनोदाच्या अचूक टायमिंगसाठी तिचे कौतुक झाले.
अभिनयाबरोबरच तिने निर्मिती क्षेत्रातही काम केले. २०११ ला प्रदर्शित झालेल्या ‘चलो दिल्ली’ या सिनेमाची तिने निर्मिती केली होती, तसेच ती या सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत दिसली होती. याबरोबरच २०२१ ला प्रदर्शित झालेल्या ‘बेल बॉटम’ या सिनेमातील तिच्या भूमिकेने लक्ष वेधून घेतले होते.
लारा दत्ताने शेअर केला व्हिडीओ
लारा दत्ता आता मात्र एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. अभिनेत्री सोशल मीडियावर सक्रिय असते. नुकताच तिने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती तिच्या मुलीसह डान्स करत असल्याचे पाहायला मिळत आहे.
लारा दत्ता तिची मुलगी साइरा भूपतीसह ‘डोन्ट माइंड’ या गाण्यावर डान्स करत असल्याचे दिसत आहे. हा व्हिडीओ शेअर करताना लाराने लिहिले की, मुलांना खूश करण्यासाठी काय-काय करावं लागतं. मात्र, या व्हिडीओमध्ये त्यांच्यातील बॉण्डिंग लक्ष वेधून घेत आहे.
लाराच्या या व्हिडीओवर अनेक कलाकारांनी कमेंट्स करत लारा व तिच्या मुलीचे कौतुक केले आहे. यामध्ये शिल्पा शेट्टी, दिया मिर्झा आणि इतर अनेक कलाकारांचा समावेश आहे. शिल्पी शेट्टीने तू उत्तम डान्स करत आहेस, अशी कमेंट केली आहे.

लाराने २०११ ला टेनिस खेळाडू महेश भूपतीबरोबर लग्नगाठ बांधली. त्यांना २०१२ला मुलगी झाली. साइरा आता १४ वर्षांची आहे.
अभिनेत्रीच्या कामाबद्दल बोलायचे तर ती लवकरच ‘वेलकम टू द जंगल’ आणि ‘रामायण’ या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
