Sunjay Kapur Sister Emotional Post Viral: अभिनेत्री करिश्मा कपूरचे एक्स पती व दिवंगत उद्योजक संजय कपूर यांची बहीण मंधीरा कपूरने इन्स्टाग्रामवर एक भावनिक पोस्ट शेअर केली. मंधीराने भावाबरोबरचे बालपणीचे काही गोंडस फोटो शेअर केले आहेत. दिवंगत भावाबरोबर जवळपास चार वर्षांपासून बोलत नसल्याचा खुलासा मंधीराने केला. एका वादामुळे ते भावनिकरित्या दुरावले होते, असंही तिने नमूद केलं. मंधीराच्या या पोस्टवर संजयची पहिली पत्नी नंदिता महतानीने कमेंट केली आहे.
मंधीराने लिहिलं की तिला भावाबरोबर घालवलेल्या चांगल्या क्षणांची आठवण येते. भावाबरोबरचे फोटो शेअर करत मंधीराने लिहिलं, “रात्री उशिरापर्यंत गप्पा मारणं, बाहेर फिरणं आणि सोबत हसणं. मला त्याच्यापासून दूर राहिल्याचा खूप पश्चात्ताप होतो. तो एक चांगला मोठा भाऊ आणि मित्र होता. मी आणि माझा भाऊ गेल्या ४ वर्षांपासून एकमेकांशी बोललो नाही, अहंकार आणि फालतू गोष्टींमुळे आम्हा भावंडांमधील भांडण प्रचंड वाढलं. पण ते आता कधीच सुधारलं जाऊ शकत नाही.”
त्याने बहिणींची काळजी घेतली – मंधीरा
“त्याने नेहमीच माझी आणि माझ्या बहिणीची काळजी घेतली. एक खूप चांगला मोठा भाऊ आणि एक मित्र होता. जे घडलं ते भयंकर आहे. मी आता त्याच्याबरोबर कधीच वेळ घालवू शकणार नाही. आम्ही पुन्हा कधीच एकत्र नसू हे सगळं भयंकर आहे. आमच्याकडून ज्या गोष्टी घडल्या, त्या आम्ही नीट करण्याचा प्रयत्न केला नाही. पण मला विश्वास आहे की माझं त्याच्यावर किती प्रेम आहे हे त्याला आमच्या दुराव्यानंतरही माहीत होतं. माझ्याप्रमाणेच त्यालाही आम्ही ४७ वर्षांपूर्वी एकमेकांशी जितक्या चांगल्या पद्धतीने राहायचो, तसंच राहू अशी आशा होती या गोष्टीचा विचार करून मला थोडा दिलासा मिळतो,” असं मंधीराने लिहिलं.
“आपल्या जवळच्या व्यक्तीपासून दुरावलेल्या प्रत्येकाने, मग ते कुटुंबीय असो वा मित्र.. माझ्याबरोबर जे घडलं त्यातून शिका. आयुष्य बेभरवशाचं आहे, प्रत्येक दिवस एक भेट आहे, दिवसातील एक तासही चंचलतेत वाया घालवू नका, तुम्हाला आयुष्यातील ही पोकळी भरून काढण्याची संधी मिळेल की नाही याची शाश्वती नाही. जर तुम्हाला ही संधी मिळाली नाही तर तुमच्याकडे फक्त पश्चात्ताप उरतो. मी माझ्या भावाला शेवटचं भेटण्यासाठी आणि मी त्याच्यावर किती प्रेम करते हे सांगण्यासाठी मी काहीही द्यायला तयार आहे,” असं मंधीराने पोस्टमध्ये भावुक होत लिहिलं.