Leela Chitnis Bollywood Career: हिंदी सिनेसृष्टीमध्ये अशा काही अभिनेत्री होऊन गेल्या, ज्यांनी काळाच्या पुढे जाऊन स्वतंत्र ओळख निर्माण केली. वयाच्या अगदी १६ व्या वर्षी लग्न झाल्यानंतर आणि चार मुले झाल्यानंतर त्या अभिनेत्रीने सिनेविश्वामध्ये स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले होते. तसेच त्यांनी ब्रिटिश राजवटीविरोधात आवाज उठवला होता, त्या अभिनेत्री म्हणजे लीला चिटणीस.
१९०९ मध्ये जन्मलेल्या लीला चिटणीस या त्याकाळीसुद्धा सुशिक्षित होत्या. वडील इंग्रजी साहित्याचे प्राध्यापक असल्याने त्यांना लहानपणापासूनच साहित्याची आवड आणि वाचनाची सवय होती. पुढे त्यांनी कला शाखेची पदवी घेतली. पण, त्यांचे वयाच्या अवघ्या १६ व्या वर्षी गजानन चिटणीस यांच्याशी लग्न झाले होते.
पतीला सोडून माहेरी परत आल्या होत्या लीला चिटणीस
लीला चिटणीस यांनी पतीबरोबर ब्रिटिशांविरोधात आवाजही उठवला होता. मात्र, त्यांचे वैवाहिक आयुष्य अतिशय खडतर होते. पतीच्या व्यसनामुळे त्यांनी नात्यातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. माहेरी परत आल्यानंतर लीला चिटणीस या शिक्षिका म्हणून काम करू लागल्या. याच काळात त्यांचा रंगभूमीशी संबंध आला आणि हळूहळू त्यांचा अभिनय क्षेत्रात प्रवास सुरू झाला.
अशोक कुमार अन् लीला चिटणीस यांची जोडी गाजली
सुरुवातीला त्यांना बॉलीवूडमध्ये छोट्या भूमिका मिळत होत्या, पण आपल्या अभिनयाच्या जोरावर लीला चिटणीस यांनी त्यांची वेगळी ओळख निर्माण केली. १९३७ मधील ‘जंटलमन डाकू’ आणि त्यानंतर १९३९ मधील ‘कंगन’ या सिनेमातील त्यांच्या भूमिका गाजल्या. पण, त्यांना खरी ओळख मिळवून दिली ती ‘बॉम्बे टॉकीज’ या सिनेमाने. देविका राणी यांच्यानंतर लीला चिटणीस या ‘बॉम्बे टॉकीज’चा प्रमुख चेहरा बनल्या. अशोक कुमार यांच्याबरोबरही त्यांची जोडी प्रचंड गाजली. यानंतर त्यांनी ‘बंधन’, ‘आजाद’ आणि ‘झूला’ यांसारख्या चित्रपटांत एकत्र स्क्रीन शेअर केली.
‘लक्स’च्या जाहिरातीत झळकणाऱ्या पहिल्या भारतीय अभिनेत्री
१९४१ मध्ये लीला चिटणीस यांनी आणखी एक विक्रम केला. त्या ‘लक्स’च्या जाहिरातीत झळकणाऱ्या पहिल्या भारतीय अभिनेत्री ठरल्या. त्या काळात लक्सच्या जाहिरातीत प्रामुख्याने हॉलीवूडच्या अभिनेत्री काम करत असत. पण, लीला चिटणीस यांनी पहिल्यांदाच लक्सच्या जाहिरातीमध्ये काम केले. यानंतर त्या लोकप्रिय कलाकारांच्या आई म्हणून सिनेविश्व गाजवू लागल्या. त्यांनी ‘शहीद’मध्ये केलेली दिलीप कुमार यांच्या आईची भूमिका विशेष गाजली. यानंतर ‘आवारा’, ‘माँ’, ‘बादबान’, ‘काला बाजार’, ‘हम दोनों’ आणि ‘गाईड’ अशा चित्रपटांत त्यांनी आईच्या भूमिका साकारल्या होत्या.
१९८५ मध्ये ‘दिल तुझको दिया’ हा त्यांचा शेवटचा चित्रपट ठरला. वयाच्या ७५व्या वर्षी त्यांनी अभिनयातून निवृत्ती घेतली आणि पुढे मुलांबरोबर राहण्यासाठी त्या अमेरिकेत गेल्या होत्या. २००३ मध्ये कनेक्टिकट येथे वयाच्या ९३व्या वर्षी त्यांचे निधन झाले.
