Leena Chandavarkar Biography Kishore Kumar Wife: ७० च्या दशकात बॉलीवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री होत्या, ज्यांनी आपल्या सौंदर्याने आणि अभिनयाने सर्वांची मने जिंकून घेतली. अशाच एका अभिनेत्रीबद्दल आज आम्ही तुम्हांला सांगणार आहोत. या अभिनेत्रीचं नाव अभिनेत्री लीना चंदावरकर. त्यांनी १९६८ मध्ये सुनील दत्त यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या ‘मन का मीत’ या चित्रपटातून आपल्या करिअरची सुरुवात केली होती.
अत्यंत सुंदर आणि लोकप्रिय अभिनेत्रींमध्ये गणल्या जाणाऱ्या लीना चंदावरकर यांचं आयुष्य एखाद्या चित्रपटाच्या कथेपेक्षा कमी नव्हतं. एकीकडे त्यांनी आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने लाखो लोकांची मने जिंकली, तर दुसरीकडे वैयक्तिक आयुष्यात इतकं दुःख सहन केलं, ज्याची कोणी कल्पनाही करू शकत नाही. त्यांनी दोन लग्नं केली, पण दोन्हीवेळा त्या विधवा झाल्या. त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जाणून घेऊयात.
लीना चंदावरकर यांचा जन्म
२९ ऑगस्ट १९५० रोजी कर्नाटकच्या धारवाडमध्ये एका कोकणी-मराठी कुटुंबात लीना चंदावरकर यांचा जन्म झाला. त्यांचे वडील श्रीनाथ चंदावरकर भारतीय सेनेत ऑफिसर होते. लीना यांना लहानपणापासून अभिनयाची आवड होती. आधी त्यांनी मॉडेलिंग व जाहिराती केल्या. त्यांनाच पहिला चित्रपट मसीहा होता, पण तो रिलीज होऊ शकला नाही. त्यानंतर १९६८ साली मन का मीत या चित्रपटातून त्यांनी इंडस्ट्रीत पदार्पण केलं आणि त्या रातोरात स्टार बनल्या.
दिग्गजांबरोबर केलं होतं काम
लीना चंदावरकर यांनी राजेश खन्ना, धर्मेंद्र, दिलीप कुमार व इतर अनेक मोठ्या कलाकारांबरोबर काम केलं. १९७१ मध्ये आलेल्या ‘मेहबूब की मेहंदी’मध्ये त्यांच्या व राजेश खन्नांच्या जोडीने प्रेक्षकांंचं खूप मनोरंजन केलं. त्यानंतर ‘एक महल हो सपनों का’, ‘बैराग’ या चित्रपटांनी त्यांना इंडस्ट्रीत यशस्वी अभिनेत्रींच्या यादीत आणून बसवलं.

पहिल्या लग्नानंतर काही दिवसांनी पतीचं निधन
यशाच्या शिखरावर असताना लीना यांनी गोव्यातील राजकीय कुटुंबातील सिद्धार्थ बांदोडकर यांच्याशी झालं होतं. पण लग्नानंतर काही दिवसांतच गोळी लागल्याने सिद्धार्थ यांचं निधन झालं आणि अवघ्या २५ व्या वर्षी लीना विधवा झाल्या. या घटनेने त्यांना मोठा धक्का बसला, मात्र त्यांनी स्वतःला सावरलं आणि चित्रपटात काम करणं सुरूच ठेवलं.
किशोर कुमार यांच्याशी प्रेम आणि लग्न
काही वर्षांनंतर त्यांची भेट महान गायक किशोर कुमार यांच्याशी झाली. सुरुवातीला लीना यांच्या वडिलांचा या नात्याला विरोध होता, कारण किशोर कुमार यांनी यापूर्वी तीन लग्ने केली होती. मात्र, नंतर त्यांचे कुटुंबीय तयार झाले आणि त्या दोघांनी लग्न केले. लीना आणि किशोर कुमार यांना एक मुलगा आहे. त्यांचं नाव सुमित कुमार आहे. पण नशिबाने इथेही त्यांची साथ दिली नाही. १९८७ मध्ये किशोर कुमार यांच्या निधनानंतर लीना दुसऱ्यांदा विधवा झाल्या. त्यावेळी त्या अवघ्या ३७ वर्षांच्या होत्या.
