बॉलीवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री होऊन गेल्या, ज्यांनी आपल्या सौंदर्य आणि अभिनयाने अवघ्या काही काळातच प्रेक्षकांच्या मनात खास स्थान निर्माण केलं. लीना चंदावरकर यांचं नावही या यादीत येतं. ७०च्या दशकात त्यांच्या सौंदर्याची आणि साधेपणाची भुरळ प्रेक्षकांना पडली होती. त्यामुळे त्या काळातील लीना चंदावरकर लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक होत्या.
लीना चंदावरकर यांनी राजेश खन्ना, धर्मेंद्र, जितेंद्र, संजीव कुमार, विनोद खन्ना, दिलीप कुमार आणि सुनील दत्त यांसारख्या दिग्गज अभिनेत्यांबरोबर काम केलं. मात्र, त्यांच्या आयुष्याची कहाणी केवळ चित्रपटांच्या झगमगाटापुरती मर्यादित नव्हती. वैयक्तिक आयुष्यात त्यांना अनेक चढ-उतारांचा सामना करावा लागला. लीना चंदावरकर यांचा जन्म २९ ऑगस्ट १९५० रोजी कर्नाटकातील धारवाड येथे झाला.त्यांचे वडील सैन्यात अधिकारी होते. चित्रपट आणि ग्लॅमरच्या दुनियेत येण्याची त्यांची मुळीच इच्छा नव्हती. मात्र, नशिबाने त्यांना हळूहळू कॅमेऱ्यासमोर आणलं आणि अभिनय क्षेत्रात त्यांचा प्रवास सुरू झाला.
बॉलीवूडमध्ये केलं पदार्पण
नवभारत टाईम्सच्या वृत्तानुसार चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवण्यापूर्वी लीना चंदावरकर यांनी जाहिरातींमध्ये काम केलं होतं. त्यानंतर त्यांनी देशभरात आयोजित करण्यात आलेल्या ‘फिल्मफेअर फ्रेश फेस’ स्पर्धेत सहभाग घेतला आणि उपविजेत्यां ठरल्या. या स्पर्धेनंतर त्यांचा बॉलीवूडमधील मार्ग मोकळा झाला. लीना चंदावरकर यांचा पहिला चित्रपट ‘मन का मीत’ हा होता, जो १९६८ मध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटाचं दिग्दर्शन सुनील दत्त यांनी केलं होतं, तर लीना यांच्याबरोबर सोम दत्त प्रमुख भूमिकेत दिसले होते. चित्रपटाला चांगलं यश मिळालं आणि लीना यांना रातोरात लोकप्रियता मिळाली. यानंतर त्यांच्याकडे चित्रपटांच्या ऑफर्सची रांग लागली.
७०चं दशक लीना चंदावरकर यांच्या करिअरमधील सर्वात खास काळ ठरला. या काळात त्या एकापेक्षा एक मोठ्या कलाकारांसह पडद्यावर झळकल्या. ‘महबूब की मेहंदी’ या चित्रपटात त्यांनी राजेश खन्ना यांच्यासह काम केलं आणि त्यांच्या अभिनयाचंही खूप कौतुक झालं. त्यावेळी राजेश खन्ना हे हिंदी सिनेमातील सर्वात मोठ्या स्टार्सपैकी एक होते. त्यामुळे त्यांच्याबरोबर काम करणं कोणत्याही अभिनेत्रीच्या करिअरसाठी मोठी गोष्ट मानली जात होती. लीना चंदावरकर यांनी धर्मेंद्र यांच्याबरोबर ‘रखवाला’ आणि ‘एक महल हो सपनों का’, जितेंद्र यांच्याबरोबर ‘हमजोली’, ‘बिदाई’ आणि ‘नालायक’, संजीव कुमार यांच्याबरोबर ‘मनचली’ आणि ‘अनहोनी’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलं. याशिवाय त्या दिलीप कुमार यांच्यासोबत ‘बैराग’मध्येही झळकल्या. त्या काळातील कदाचितच असा एखादा मोठा अभिनेता असेल, ज्यांच्यासोबत लीना चंदावरकर यांनी काम केलं नसेल.
अपघातात गोळी लागून पतीचा झाला मृत्यू
पडद्यावर यश मिळत असतानाच लीना चंदावरकर यांच्या वैयक्तिक आयुष्याला अचानक वेगळं वळण मिळालं. लीना यांचं पहिलं लग्न गोव्यातील प्रतिष्ठित राजकीय कुटुंबातील सिद्धार्थ बांदोडकर यांच्यासोबत झालं होतं. सिद्धार्थ हे गोव्याचे पहिले मुख्यमंत्री दयानंद बांदोडकर यांचे पुत्र होते. मात्र, लग्नानंतर अवघ्या काही दिवसांतच एका अपघातात गोळी लागल्याने सिद्धार्थ यांचा मृत्यू झाला. त्यावेळी लीना फक्त २५ वर्षांच्या होत्या. इतक्या कमी वयात पतीला गमावणं हा लीना यांच्यासाठी आयुष्यातील मोठा धक्का होता.
किशोर कुमार यांच्याबरोबर केलं दुसरं लग्न
काही वर्षांनंतर लीना चंदावरकर यांच्या आयुष्यात प्रसिद्ध गायक आणि अभिनेते किशोर कुमार आले आणि दोघांनी लग्न केलं. त्यांच्या नात्याची त्यावेळी बरीच चर्चा झाली होती. किशोर कुमार यांचं यापूर्वी तीन वेळा लग्न झालं होतं आणि ते लीना यांच्यापेक्षा वयाने बरेच मोठे होते. त्यामुळे सुरुवातीला लीना यांच्या वडिलांचा या लग्नाला विरोध होता. मात्र, नंतर दोघांनी लग्न केलं. या दाम्पत्याला सुमित कुमार हा मुलगा झाला. मात्र, नियतीने लीना यांना पुन्हा एकदा मोठा धक्का दिला. १९८७ मध्ये किशोर कुमार यांचं निधन झालं. त्यावेळी लीना यांचं वय फक्त ३७ वर्षे होतं. एका पाठोपाठ आलेल्या या दुःखद घटनांमुळे त्या कठीण प्रसंगातून जात होत्या.
किशोर कुमार यांच्यासोबत लग्न केल्यानंतर लीना चंदावरकर यांनी चित्रपटांपासून काहीसं अंतर राखलं. मात्र, त्यांनी पूर्णपणे पडद्यापासून दूर जाण्याचा निर्णय घेतला नाही आणि त्यानंतर काही चित्रपटांमध्ये त्या दिसल्या. १९८५ मध्ये त्या ‘सरफरोश’ या चित्रपटात झळकल्या. त्यानंतर १९८९ मध्ये प्रदर्शित झालेला ‘ममता की छांव में’ हा त्यांचा शेवटचा चित्रपट मानला जातो. या चित्रपटात त्या पुन्हा एकदा राजेश खन्ना यांच्याबरोबर झळकल्या.
