Kamini Kaushal passes away: बॉलीवूडच्या लोकप्रिय अभिनेत्री कामिनी कौशल यांचे निधन झाले आहे. ९८ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दीर्घकाळापासून त्या आजारी होत्या. त्यांच्या निधनानंतर मनोरंजन विश्वातून हळहळ व्यक्त केली जात आहे.
ज्येष्ठ अभिनेत्री कामिनी कौशल यांचे निधन
भारताला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वीच त्यांनी हिंदी चित्रपटांत काम करण्यास सुरुवात केली. कामिनी कौशल यांनी १९४६ मध्ये हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते. १९४६ ला प्रदर्शित झालेल्या ‘नीचा नगर’ या चित्रपटातून त्यांनी पदार्पण केले होते. या चित्रपटाने कान्स चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळवला.
यानंतर कामिनी कौशल १९४७ ला प्रदर्शित झालेल्या ‘दो भाई’, १९४८ ला प्रदर्शित झालेल्या ‘शहीद’मध्ये दिसल्या होत्या. याबरोबरच १९४८ ला प्रदर्शित झालेल्या ‘नदियां के पार’, ‘जिद्दी’ या चित्रपटांत त्यांनी काम केले. १९४९ ला प्रदर्शित झालेल्या ‘पारस’, ‘नमुना’, ‘आरजू’, ‘शबनम’, यांसारख्या चित्रपटांतून त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले.
कामिनी कौशल यांची महत्त्वाची भूमिका असलेला ‘आबरू’ हा चित्रपट १९५६ ला प्रदर्शित झाला होता. ‘बडे सरकार’ हा चित्रपट १९५७ ला प्रदर्शित झाला होता; तर ‘जेलर’, ‘नाइट क्लब’ हे चित्रपट १९५८ ला प्रदर्शित झाले होते. १९६३ ला प्रदर्शित झालेल्या ‘गोदान’ चित्रपटातील त्यांच्या भूमिकेचे मोठे कौतुक झाले होते.
कामिनी कौशल यांनी दिलीप कुमार, राज कपूर, देव आनंद आणि अशोक कुमार यांच्यासह अनेक दिग्गज अभिनेत्यांबरोबर काम केले. ‘नदिया के पार’, ‘शहीद’, ‘शबनम’ आणि ‘आरजू’ यांसारख्या चित्रपटांमध्ये दिलीप कुमार यांच्याबरोबरची त्यांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री खूप गाजली.
लाहोरमध्ये उमा कश्यप म्हणून जन्मलेल्या कामिनी यांचे कुटुंब उच्चशिक्षित होते. त्यांचे वडील शिवराम कश्यप हे एक प्रसिद्ध वनस्पतिशास्त्रज्ञ होते. त्यांनी लाहोरमध्ये वनस्पतिशास्त्र विभागाची स्थापना केली. भारतीय वैज्ञानिक वर्तुळात ते एक महत्त्वाचे व्यक्तिमत्व होते. कामिनी यांचे बालपण घोडेस्वारी, भरतनाट्यम, पोहणे आणि हस्तकला यांसह अनेक कौशल्ये शिकण्यात गेले. त्यांनी रेडिओ नाटके आणि नाट्यगृहांमध्येदेखील भाग घेतला, ज्याचा उपयोग त्यांना अभिनय क्षेत्रात झाला.
‘नीचा नगर’ या चित्रपटाचे दिग्दर्शक चेतन आनंद यांनी उमा कश्यप नावाचा दुसऱ्या अभिनेत्रींच्या नावाशी गोंधळ होऊ नये म्हणून कामिनी कौशल हे स्क्रीन नेम त्यांना दिले.
याबरोबरच, ‘चेन्नई एक्स्प्रेस’, ‘कबीर सिंह’, ‘लाल सिंह चड्ढा’, अशा चित्रपटांतदेखील त्या महत्त्वाच्या भूमिकेत दिसल्या. २५ फेब्रुवारी २०२५ रोजी त्यांनी ९८ वा वाढदिवस साजरा केला. दरम्यान, वाढत्या वयाबरोबर त्यांना अनेक व्याधी जडल्या होत्या, अशी माहिती समोर आली आहे.
