Deven Bhojani once ate a chicken: खिचडी, साराभाई व्हर्सेस साराभाई, स्कूप, बा बहू और बेबी यांसारख्या शोसाठी अभिनेता आणि दिग्दर्शक देवेन भोजानी ओळखला जातो. साराभाई व्हर्सेस साराभाई या शोचे देवेन भोजानीने दिग्दर्शनही केले आहे.

आता अभिनेता त्याच्या कामामुळे नाही तर त्याने सांगितलेल्या एका आठवणीमुळे चर्चेत आहे. देवेनने करिअरच्या सुरुवातीच्या काळात चुकून चिकन सँडविच खाल्लं होतं. विशेष म्हणजे, त्याला ते आवडलंही होतं. मात्र, जेव्हा त्याला समजले की त्याने चिकन खाल्ले आहे, तेव्हा त्याला वाईट वाटलं.

कुणाल विजयकर यांच्या खाने में क्या है या कार्यक्रमात देवेन भोजानीने हजेरी लावली होती. त्यावेळी त्यांनी जो जिता वहीं सिंकदर या सिनेमाच्या शूटिंगदरम्यान काय घडले होते हे सांगितले. या चित्रपटात त्याने एक छोटीशी भूमिका साकारली होती. तसेच, सहाय्यक दिग्दर्शक म्हणूनही काम केले होते. अभिनेता म्हणाला, “आम्ही त्यावेळी बांद्र्याच्या ऑफिसमध्ये खूप वेळ घालवायचो. आम्ही चार सहाय्यक होतो. जेव्हा ब्रेक असायचा त्यावेळी कँडीजमध्ये जायचो, नाही तर तिथल्या जवळच्या छोट्या सँडविचच्या दुकानात जायचो.”

“मग अचानक माझ्या एका मित्राने…”

अभिनेता पुढे म्हणाला, “एके दिवशी आम्ही सगळ्यांनी आपापले सँडविच ऑर्डर केले. मी माझं सँडविच खायला सुरुवात केली तेव्हा मला वाटलं की हे खूप वेगळं आणि खूप चविष्ट आहे. मी विचार केला की इथे जास्त वेळा यायला पाहिजे. हे स्वस्त आणि चांगलं आहे. मग अचानक माझ्या एका मित्राने विचारलं की माझं चिकन सँडविच कुठं आहे? मी व्हेज ऑर्डर केलं नव्हतं, तेव्हा लक्षात आलं की ते मीच खाल्लं होतं.”

जेव्हा चिकन सँडविच खाल्ल्याची जाणीव झाली, तेव्हा काय भावना होत्या हे सांगत अभिनेता म्हणाला, “मला ते सँडविच आवडलं, पण मला खूप वाईट वाटलं. मी लगेच देवाची माफी मागितली, ते पूर्णपणे अनवधानाने झालं होतं.”

काही दिवसांपूर्वी देवेन भोजानीने स्क्रीनला मुलाखत दिली होती. या मुलाखतीत त्याने जो जिता वहीं सिंकदर सिनेमाने करिअरला कसा आकार दिला याबद्दल सांगितले होते. तो म्हणालेला, “मी या चित्रपटात अभिनेता म्हणून सहभागी झालो होतो, आमिर खान माझा कॉलेजपासून मित्र आहे. त्याने मला तांत्रिक गोष्टी समजण्यासाठी सहाय्यक म्हणूनही काम करायला सांगितलं. त्यानंतर मी मन्सूर खान यांचा सहाय्यक म्हणून काम करायला लागलो. या अनुभवामुळे त्यांना दिग्दर्शनाची आवड निर्माण झाली. मात्र, तरीही या चित्रपटानंतर अभिनयात काम करण्यावर भर दिला.”

दरम्यान, अभिनेत्याने एक महाल हो सपनों का, साराभाई व्हर्सेस साराभाई, सुमित संभाल लेगा सारखे लोकप्रिय प्रोजेक्ट्स दिग्दर्शन केले आहेत. तसेच, कमांडो २ या चित्रपटाचेही दिग्दर्शन केले आहे.