लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने नुकतीच ५७ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली आहे. यामध्ये महाराष्ट्रातून सात जणांना संधी देण्यात आली आहे. लोकसभेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून गोविंदाचे नाव चर्चेत आल्यानंतर आता काँग्रेसनेही बॉलीवूड अभिनेत्रीला मैदानात उतरवण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. वृत्तांच्या माहितीनुसार उत्तर मध्य मुंबईतील जागेसाठी आता राज बब्बर यांच्यानंतर अभिनेत्री स्वरा भास्करचं नाव चर्चेत आलं आहे. स्वरा १७ मार्च रोजी झालेल्या राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेत सहभागी झाली होती. तेव्हापासून अभिनेत्री निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. उत्तर मध्य मुंबई अत्यंत महत्त्वाचा मतदारसंघ असल्याने याची उमेदवारी कोणाला मिळते याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिल होतं. अशातच अभिनेत्रीने महाराष्ट्र काँग्रसचे प्रभारी रमेश चेन्निथला यांची दिल्लीत भेट घेतली. या भेटीनंतर स्वराचं नाव उमेदवारीसाठी आघाडीवर आहे. हेही वाचा : सात वर्षांच्या प्रयत्नानंतर गरोदर होती राणी मुखर्जी, पण झाला गर्भपात; खंत व्यक्त करत म्हणाली, “मी माझ्या मुलीला…” अभिनेत्री स्वरा भास्कर सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकदा सरकारविरोधात तिची बेधडक मतं मांडत असते. याशिवाय अभिनेत्रीने तिच्या एक्स पोस्टद्वारे अनेकवेळा आपली परखड राजकीय मतं मांडली आहेत. २०१९ मध्ये सीएए आणि एनआरसी कायद्यांविरोधात ती मैदानात उतरली होती. तसेच काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेतही तिचा सहभाग होता. आता येत्या दोन दिवसांत स्वराच्या उमेदवारीबाबत अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे. हेही वाचा : “ऐश्वर्या राय स्क्रीनवर साधी दिसावी यासाठी खूप प्रयत्न केले, पण…”, रणदीप हुड्डाचा खुलासा; म्हणाला, “सेटवर…” उत्तर मध्य मुंबईची जागा अनेक वर्षे काँग्रेसच्या हातात होती. परंतु, २०१४ आणि १०१९ च्या निवडणुकीत या जागेवर पूनम महाजन विजयी झाल्या होत्या. काँग्रेसकडून गेल्या दोन्ही निवडणुकांमध्ये प्रिया दत्त यांना पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. दरम्यान, भाजपने मुंबईतील दोन जागांसाठी आपले उमेदवार जाहीर केले आहेत. यात उत्तर मुंबईतून केंद्रीय मंत्री पियुष गोयल आणि उत्तर पूर्व मुंबईतून मिहिर कोटेचा निवडणूक लढवत आहेत.