Aishwarya Rai at Cannes Film Festival 2026 : कान्स फिल्म फेस्टिवल २०२६ सुरू झाला असून, अनेक आंतरराष्ट्रीय फॅशन आयकॉन यामध्ये सहभागी होत आहेत. समुद्रकिनारी कान्स शहरामध्ये अभिनेत्री, मॉडेल्स व सेलिब्रिटी यांची मांदियाळी सुरू आहे. अनेक दशकांपासून कॉस्मेटिक कंपनी L’Oréal पॅरिस ही कान्स फेस्टिवलशी जोडलेली आहे. हा ब्रँड अनेक वर्षांपासून या प्रतिष्ठित कान्स चित्रपट महोत्सवाचा प्रायोजक राहिला आहे. L’Oréal पॅरिसने जगभरातील लोकप्रिय व प्रसिद्ध अभिनेत्रींना रेड कार्पेटवर आणले. त्यामध्ये प्रामुख्याने ऐश्वर्या रायचे नाव येते. मात्र, या वर्षी तिचे नावदेखील न घेतल्यामुळे चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली. त्यावर L’Oréal ने सोशल मीडियावर चाहत्यांच्या प्रश्नांची उत्तरे दिली.

ऐश्वर्याने गाजवले आहे कान्स फेस्टिव्हल

बॉलीवूड अभिनेत्री आणि १९९४ ची मिस वर्ल्ड ऐश्वर्या राय आणि कान्स फेस्टिवल हे एक समीकरण बनले आहे. ऐश्वर्या राय पहिल्यांदा २००२ मध्ये शाहरुख खानसह रेड कार्पेटवर झळकली होती. ते, त्यांच्या देवदास चित्रपटाचे प्रमोशन होते. मात्र त्यानंतर L’Oréal पॅरिस या ब्रॅण्डची ग्लोबल ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून ऐश्वर्याने रेड कार्पेट गाजवले आहे.

हटके स्टाईल, सौंदर्य व आत्मविश्वास यांची झलक ऐश्वर्याच्या रेड कार्पेट लूकमध्ये दिसून येते. अनेकदा तिने भारतीय संस्कृतीचे प्रतीक असलेली साडी परिधान करीत आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची ओळख अधिक ठळकपणे मांडली.

मार्टिनेज हॉटेलच्या पोस्टरवरुन ऐश्वर्या गायब

यंदा मात्र आलिया भट्ट लोरियल पॅरिस या ब्रॅन्डची ग्लोबल ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून झळकत आहे. आलियाचा रेड कार्पेट लूक व्हायरल झाला असून, तिच्या अदांचे सर्वांनी कौतुक केले. मात्र, कान्स फेस्टिवलचे आकर्षण असलेली ऐश्वर्या राय मात्र कुठेही दिसून आली नाही. लोरियल पॅरिसने ऑफिशियल इन्स्टाग्राम पेजवरून मार्टिनेज हॉटेलचे फोटो शेअर केले. त्यामध्ये आलिया भट्टसह त्यांच्या ब्रँडचे प्रतिनिधित्व करणाऱ्या जगभरातील ब्रँड अॅम्बेसेडर्सचे फोटो होते. मात्र, त्यामध्ये ऐश्वर्या दिसून आली नाही. लोरियल पॅरिसला आशियाई देशांमध्ये लोकप्रिय करणारी ऐश्वर्या राय यामध्ये नसल्याने चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली. सोशल मीडियावर ऐश्वर्या राय कुठे आहे अशा कमेंट्सचा वर्षाव झाला.

‘लोरियल पॅरिस’च्या अधिकृत खात्याने दिले उत्तर

एका नेटकऱ्याच्या कमेंटला लोरियल पॅरिसने थेट उत्तर दिले आहे. ब्रँडवर टीका करणाऱ्या कमेंटला ‘लोरियल’ने उत्तर दिले आहे. एका नेटकऱ्याने या ब्रँडला टॅग करीत लिहिले, “ऐश्वर्या राय-बच्चन कुठे आहे? आम्हाला ऐश्वर्या राय बच्चन फक्त ‘कान्स’ फेस्टिवलमध्ये दिसते. ऐश्वर्याचा ऑरो (aura) अतुलनीय आहे. त्यामुळे तिला प्रमोट करा आणि तिचा सन्मान करा.” असे चाहत्याने लिहिले.

(फोटो सौजन्य – एक्स)

‘लोरियल पॅरिस’चे उत्तर

चाहत्याच्या या ट्वीटवर ‘लोरियल पॅरिस’च्या अधिकृत खात्याने उत्तर दिले, “वर्षानुवर्षं एकामागून एक कान्स महोत्सव झाले आणि ती कधीच गैरहजर राहिली नाही,” असा रिप्लाय लोरियल पॅरिसच्या ऑफिशियल अकाऊंटवरून देण्यात आला आहे. त्यामुळे ऐश्वर्या लवकरच कान्समध्ये दिसेल याची उत्सुकता चाहत्यांना लागली आहे.