बॉलीवूडमध्ये असे अनेक चेहरे आहेत, ज्यांना पाहिल्यावर ‘यांना कुठेतरी पाहिलंय’ असं वाटतं, पण नाव पटकन आठवत नाही. ९० च्या दशकातील अशाच एका अभिनेत्रीबद्दल आपण बोलत आहोत. टीव्हीवरील लोकप्रिय मालिका व चित्रपटांत तिने काम केलं आहे. तिने बॉलीवूडमधील मोठ्या स्टार्सबरोबर स्क्रीन शेअर केली असून, ‘हम साथ साथ हैं’ सारख्या गाजलेल्या चित्रपटातही ती झळकली होती. इतकंच नाही तर ‘महाभारत’ सारख्या ऐतिहासिक मालिकेतही त्यांची महत्त्वाची भूमिका होती. सर्वात रंजक गोष्ट म्हणजे, या अभिनेत्रीचं मिथुन चक्रवर्ती यांच्याशी खास नातं आहे. ती मिथुन यांची विहीण आहे.
मिथुन चक्रवर्तीची विहीण कोण आहे?
मिथुन चक्रवर्तींच्या विहीणीचं नाव आहे अभिनेत्री शीला शर्मा. ‘महाभारत’ मालिकेत ‘देवकी’ची भूमिका साकारून त्या घराघरात लोकप्रिय झाल्या होत्या. त्यांचा साधा आणि भावुक अभिनय लोकांना इतका आवडला की, त्यांची छोटीशी भूमिकाही आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. तसेच, ‘नदिया के पार’ चित्रपटातील ‘रज्जो’च्या भूमिकेनं त्यांना एक वेगळी ओळख मिळवून दिली. ‘हम साथ साथ हैं’ या चित्रपटात शीला शर्मा यांनी नीलमच्या वहिनीची भूमिका साकारली होती, जी प्रेक्षकांना खूप आवडली होती.
शीला शर्मा यांचं करिअर
शीला शर्मा या ९० च्या दशकातील अशा अभिनेत्रींपैकी एक आहेत, ज्यांनी टीव्ही आणि चित्रपट अशा दोन्ही माध्यमांत आपली ओळख निर्माण केली. त्यांनी १९८२ मध्ये ‘सुन सजना’ या चित्रपटातून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. या चित्रपटात मिथुन चक्रवर्तीदेखील होते. त्यानंतर शीला यांनी अनेक मोठे कलाकार व दिग्दर्शकांबरोबर काम केलं. टीव्हीवर त्यांना खरी ओळख बी.आर. चोप्रा यांच्या ‘महाभारत’ मालिकेतील ‘देवकी’च्या भूमिकेमुळे मिळाली, ज्यामुळे त्या घराघरांत पोहोचल्या.

शीला शर्मा यांची ‘नदिया के पार’ मधील ‘रज्जो’ची भूमिका खूप गाजली होती. याशिवाय त्या ‘अबोध’, ‘घातक’, ‘यस बॉस’, ‘मन’ आणि ‘हम साथ साथ हैं’ सारख्या चित्रपटांतही त्या झळकल्या. विशेष म्हणजे, त्यांनी शाहरुख खान, आमिर खान आणि सलमान खान या तिन्ही खान्सबरोबर काम केले असून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे.
मिथुन चक्रवर्ती यांच्याशी शीला शर्मा यांचं नातं
शीला शर्मा यांच्या प्रमाणेच त्यांची मुलगी मदालसा शर्मा हीदेखील टीव्हीवरील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने ‘अनुपमा’ मालिकेत ‘काव्या’ची भूमिका साकारली होती. २०१८ मध्ये मदालसाचे लग्न मिथुन चक्रवर्ती यांचा मुलगा मिमोह याच्याशी झाले. म्हणजेच, अभिनेत्री शीला शर्मा या मिथुन चक्रवर्ती यांच्या विहीणबाई आहेत.
