Actress Madhoo on Nana Patekar: नाना पाटेकर हे त्यांच्या विविध भूमिका, त्यांचा अभिनय यामुळे लोकप्रिय आहेत. त्यांचे मराठी-हिंदी सिनेमे गाजले आहेत. त्यांनी मराठी नाटकांतही काम केले आहे. त्यांचा संपूर्ण देशभरात मोठा चाहतावर्ग आहे. त्यांच्याबरोबर काम केलेले सहकलाकार अनेकदा त्यांच्या स्वभावाबद्दल सांगतात, त्यांच्याबरोबर काम करण्याचा अनुभव सांगतात. सेटवर बऱ्याच कलाकार आणि दिग्दर्शकांबरोबर त्यांचे वाद झाल्याचे किस्से अनेकजण सांगतात. आता एका अभिनेत्रीने नाना पाटेकरांबरोबर काम करण्याचा अनुभव सांगितला आहे.

“तेव्हा त्यांनी अचानक मला…”

यशवंत या सिनेमात नाना पाटेकर व अभिनेत्री मधू हे प्रमुख भूमिकेत दिसले होते. आता अभिनेत्री मधूने एका मुलाखतीत नाना पाटेकरांबरोबर काम करण्याचा अनुभव सांगितला आहे. तिने नुकतीच हिंदी रशला मुलाखत दिली. या मुलाखतीत ती म्हणाली, “एक सीन होता, ज्यामध्ये मला रडायचे होते; त्यामुळे मी ग्लिसरीन घेण्यासाठी गेले तर त्यांनी मला ते वापरू दिलं नाही. नाना पाटेकरांचं म्हणणं होतं की तुझ्या मनात या भावना जाग्या कर, डोळ्यांतून आपोआप अश्रू आले पाहिजेत. मला ते जमत नव्हतं, तेव्हा त्यांनी अचानक मला कानाखाली मारली. त्यांनी इतक्या जोरात मारले होते की माझ्या डोळ्यांत अश्रू आले होते”, असे म्हणत अभिनेत्रीने यशवंत सिनेमातील सीनच्या शूटिंगचा किस्सा सांगितला.

पुढे ती असेही म्हणाली, “त्यांनी अचानक मला कानाखाली मारली, त्यामुळे मला त्यांचा खूप राग आला होता. कारण आम्ही सराव केला होता, त्यावेळी त्यांनी असे काहीच केले नाही. त्यांनी अचानक कानाखाली मारल्यामुळे मला धक्का बसला. मला पटकन राग येतो आणि त्यामुळे मीही त्यांना कानाखाली मारली.”

त्या सगळ्या प्रकारची सिनेमातील भावनिक सीनला मदत झाली, असेही अभिनेत्रीने सांगितले. ती म्हणाली, “यशवंत सिनेमातील तो सर्वात महत्त्वाचा सीन होता. दिग्दर्शक अनिल मट्टू यांनी त्या सीनच्या शूटिंगसाठी संपू्र्ण दिवस राखून ठेवला होता. पण, नानांनी कानाखाली मारल्यामुळे मी भावूक झाले आणि त्या सीनचे अर्ध्या तासात शूटिंग झाले. नाना पाटेकरांबरोबर काम करताना मी खऱ्या अर्थाने मेथड अॅक्टर झाले.”

पुढे ती असेही म्हणाली, “नाना पाटेकर माझ्याशी कायम आदराने वागायचे. ते कधीही अनादर करायचे नाहीत. ते कधीही उद्धटपणे वागले नाहीत. माझ्या अभिनयात सुधारणा व्हावी असे त्यांना वाटत होते. मी ग्लिसरीन वापरायचे ते त्यांना आवडायचे नाही. सीन संपल्यानंतर त्या पात्रातून मी बाहेर यायचे. नानांचे म्हणणे होते की आपण ते पात्र जगले पाहिजे.”

दरम्यान, नाना पाटेकर आजही विविध भूमिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येतात. ते संकल्प या वेब सीरिजमधूनही प्रेक्षकांच्या भेटीला आले होते.