Priyanka Chopra’s mother Dr. Madhu Chopra Skincare Secret: बदलत्या जीवनशैलीबरोबर, तसेच वाढत्या वयाबरोबर आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होतात. काही वेळा थंडी, उन्हाळा सहन न झाल्यामुळे त्वचेच्या अनेक समस्या निर्माण होतात. काहीजण काही घरगुती उपाय करत या समस्या कमी करण्याचा प्रयत्न करतात. मात्र, या सगळ्यात तज्ज्ञांचा सल्ला घेणे महत्त्वाचे ठरते.
अनेक कलाकार त्यांच्या जीवनशैलीबद्दल, त्यांच्या दिनचर्येबद्दल तसेच त्यांच्या आहारात काय असते, याबरोबरच ते त्यांच्या त्वचेची, केसांची काळजी कसे घेतात याबद्दल खुलेपणाने सांगतात. आता प्रियांका चोप्राच्या आई डॉक्टर मधु चोप्रांनी त्या कशाप्रकारे त्यांच्या त्वचेची काळजी घेतात, हे सांगितले आहे.
डॉक्टर मधू चोप्रा सोशल मीडियावर सक्रिय असतात. त्यांनी नुकताच सोशल मी़डियावर एक व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओमध्ये त्वचा निरोगी राहावी म्हणून त्या काय करतात, त्या त्यांच्या त्वचेची कशी काळजी घेतात, याबद्दल सांगितले. त्या नेमकं काय म्हणाल्या, हे जाणून घेऊ…
“मी माझ्या त्वचेसाठी साबण…”
मधू चोप्रा म्हणाल्या, “मी माझ्या त्वचेसाठी साबण किंवा फेसवॉश वापरत नाही. काही वेळा मी स्क्रब वापरते. कारण, जसे तुमचे वय वाढते, त्यावेळी मृत त्वचेच्या पेशी वाढतात. त्यामुळे स्क्रब दररोज करणे, गरजेचे असते. माझ्या चेहऱ्यासाठी मी फक्त स्क्रब वापरते. माझी त्वचा आधीपासूनच चांगली आहे. त्यावर मुरुम, ॲक्ने किंवा पिग्मेंटेशन येत नाही. ते येऊ नयेत म्हणून मी काही उपाय करते. मी जे उटणे वापरते, त्याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे. हे उटणे माझी मुलगी प्रियांकादेखील वापरते. दोन चमच बेसन, १ चमच दूधाची साय, दही, हळद व थंड दूध हे सर्व एकत्र करायचे.”
त्या पुढे म्हणाल्या, “सर्व एकत्र मिसळा आणि एक मिनिट तसेच ठेवून द्या.हे फेस मास्क म्हणून वापरता येतं हे चेहऱ्यावर लावा. १५–२० मिनिटांनी चेहरा स्वच्छ धुवून घ्या. ज्यांची त्वचा खूप गोरी आहे त्यांनी हळद खूप कमी प्रमाणात वापरावी. हे उटणे वापरल्यानंतर चेहरा उजळतो”, असे मधू चोप्रा म्हणाल्या.
मधू चोप्रा असेही म्हणाल्या, “या मिश्रणातील हे सगळे घटक त्वचेसाठी फायदेशीर आहेत. माझी त्वचा खूप कोरडी आहे, त्यामुळे मी घरची बनवलेली थोडी साय वापरते. तसेच, मी ताजे दही वापरते. कारण त्यात लॅक्टिक अॅसिड असते. हळदीमुळे सूज, इन्फेक्शन, फोड आणि ॲक्ने येत नाहीत.”
मधू चोप्रा जरी त्यांची त्वचा निरोगी ठेवण्यासाठी हा घरगुती उपाय करत असल्या तरीही प्रत्येकाची त्वचा वेगळी असल्याने त्वचेच्या समस्यांसाठी तज्ज्ञांची मदत घेणे, त्यांच्या सल्ल्यानुसार उपाय करणे महत्त्वाचे ठरते.
