Madhubala Dilip Kumar Breakup Reason: बॉलीवूडमधील अनेक जोडपी वर्षानुवर्षे चर्चेत असतात. त्यांच्या लव्हस्टोरीबद्दल बऱ्याचदा बोलले जाते. मधुबाला आणि दिलीप कुमार यांच्या लव्हस्टोरीबद्दलही बऱ्याचदा बोलले जाते.

मधुबाला आणि दिलीप कुमार या दोघांचं एकमेकांवर प्रचंड प्रेम होतं. मात्र, त्याचा शेवट दुःखद झाला. गेल्या अनेक वर्षांत त्यांच्या ब्रेकअपमागील कारणांबाबत वेगवेगळे दावे करण्यात आले आहेत.

मुमताज यांचा दावा चुकीचा- मधुर भुषण

याआधी ज्येष्ठ अभिनेत्री मुमताज यांनी मधुबालाच्या हृदयविकाराबद्दल आणि तिला आई होता येणार नसल्याचं समजल्यानंतर दिलीप कुमार यांनी तिच्याशी नातं तोडलं असा दावा केला होता. मात्र, आता मधुबालाची बहीण मधुर भूषण यांनी हा दावा चुकीचा असल्याचं स्पष्ट केलं आहे.

दिलीप कुमार व मधुबाला यांच्या ब्रेकअपचं काय होतं कारण?

विकी लालवानी यांना दिलेल्या मुलाखतीत मधुर भूषण यांनी मधुबाला आणि दिलीप कुमार यांच्या नात्याबद्दल वक्तव्य केलं. त्यांच्या ब्रेकअपबद्दल त्या म्हणाल्या, “त्यांच्या ब्रेकअपची गोष्ट मोठी आहे. ज्यावेळी मधुबाला व दिलीप कुमार यांचं ब्रेकअप झालं, त्यावेळी मधुबालाला हृदयाचा कोणताही आजार नव्हता.” मुमताज यांनी केलेला दावा पूर्णपणे चुकीचा असल्याचंही त्यांनी सांगितलं.

मधुबाला व दिलीप कुमार (फोटो सौजन्य: द इंडियन एक्सप्रेस)

मधुर यांच्या म्हणण्यानुसार, १९५८ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘चलती का नाम गाडी’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान मधुबालाला हृदयाशी संबंधित समस्या जाणवू लागल्या होत्या.

मधुबाला आणि दिलीप कुमार यांचं ब्रेकअप १९५७ च्या सुमारास, ‘मुघल-ए-आझम’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान झाल्याचं म्हटलं जातं.दि मधुबालाचे वडील अताउल्लाह खान आणि दिलीप कुमार यांच्यातील मतभेद हे त्यांच्या ब्रेकअपमागील एक महत्त्वाचं कारण मानलं जातं.

दिलीप कुमार यांनी त्यांच्या ‘द सबस्टन्स अँड द शॅडो’ या आत्मचरित्रातही या नात्याबद्दल लिहिलं आहे. अताउल्लाह खान यांना स्वतःचा चित्रपट स्टुडिओ सुरू करायचा होता. त्यामध्ये दिलीप कुमार आणि मधुबाला यांनी प्रमुख भूमिका साकाराव्यात अशी त्यांची इच्छा होती. मात्र, दिलीप कुमार यांना हे मान्य नव्हते, त्यामुळे त्यांच्यातील मतभेद वाढले होते.

मधुबाला व किशोर कुमार (फोटो सौजन्य: द इंडियन एक्सप्रेस)

मधुर भूषण मधुबालाच्या आजाराबद्दल म्हणाल्या, “‘बहुत दिन हुए’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान मधुबाला बेशुद्ध पडली होती आणि तिला रक्ताची उलटी झाली होती. त्यानंतर तिच्या हृदयात छिद्र असल्याचं समोर आलं. पुढे किशोर कुमार यांनी मधुबालाशी लग्न केलं आणि उपचारांसाठी तिला लंडनला नेलं. मात्र, त्याकाळी तिच्या आजारावर उपचार उपलब्ध नसल्याचं डॉक्टरांनी सांगितलं होतं.”

किशोर कुमार यांच्याशी लग्न झाल्यानंतरही मधुबाला दिलीप कुमार यांना पूर्णपणे विसरू शकल्या नव्हत्या

मधुर यांनी असाही दावा केला की, किशोर कुमार यांच्याशी लग्न झाल्यानंतरही मधुबाला दिलीप कुमार यांना पूर्णपणे विसरू शकल्या नव्हत्या. आयुष्याच्या अखेरच्या दिवसांत तिने आपल्या बहिणीजवळ याबद्दलच्या भावना व्यक्त केल्या होत्या. “मी युसूफ साहेबांना विसरू शकत नाही,” असं मधुबाला म्हणाल्याची आठवण मधुर यांनी सांगितली.

किशोर कुमार व मधुबाला (फोटो सौजन्य: द इंडियन एक्सप्रेस)

विशेष म्हणजे दिलीप कुमार आणि मधुबाला यांना मुंबईतील जुहू मुस्लीम कब्रिस्तानात एकमेकांपासून अवघ्या पाच ते दहा मीटर अंतरावर दफन करण्यात आल्याचंही मधुर यांनी सांगितलं.

मधुबालाचं १९६९ मध्ये ३६ व्या वर्षी निधन झालं, तर दिलीप कुमार यांचे २०२१ ला ९८ व्या वर्षी निधन झाले.