Madhuri Dixit : माधुरी दीक्षित व डॉ. श्रीराम नेने यांची जोडी कायमच चर्चेत असते. या दोघांकडे मनोरंजन विश्वातील आदर्श जोडपं म्हणून पाहिलं जातं. धकधक गर्लची क्रेझ, तिचा डान्स, तिचं सुंदर हास्य याची आजही सर्वत्र चर्चा होत असते. माधुरीने यशाच्या शिखरावर असताना डॉ. नेनेंशी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. या दोघांचा लग्नसोहळा १७ ऑक्टोबर १९९९ रोजी अमेरिकेत पार पडला होता.

माधुरी आणि डॉ. नेने यांची पहिली भेट अभिनेत्रीच्या भावाने आयोजित केलेल्या एका फॅमिली पार्टीमध्ये झाली होती. या पार्टीत या दोघांमध्ये छान मैत्री झाली, पुढे दोघांच्या भेटीगाठी आणखी वाढल्या. त्यानंतर या दोघांनी डेटवर जाण्याचा निर्णय घेतला. ‘धकधक गर्ल’ने काही वर्षांपूर्वी दिलेल्या मुलाखतीत तिच्या पहिल्या डेटविषयी सांगितलं होतं.

माधुरी आणि डॉ. श्रीराम नेने यांची पहिली डेट म्हणजे एक एडव्हेंचर होतं. एका मुलाखतीत माधुरीने तिच्या पहिल्या डेटची आठवण सांगितली होती. माधुरी म्हणाली, “जेव्हा आमची पहिली डेट होती तेव्हा डॉ. नेने मला म्हणाले की, ‘चल बाईकने डोंगरावर जाऊ’. त्यावेळी माझी अवस्था अशी होती की तेव्हा बऱ्याच वर्षांत मी सायकलवरही बसले नव्हते. पण मी विचार केला की चला जाऊयात. त्यावेळी माझ्या आईने मला विचारलं होतं, ‘तुला माहीत आहे ना तू काय करत आहेस? बाईकने डोंगरांवर जाणं काय असतं?’ त्यावर मी आईला म्हणाले, हो! मला माहीत आहे बाईकवर मागे बसायचं आहे आणि जायचं आहे. पण जेव्हा मी बाईकवरून गेले तेव्हा मला प्रत्यक्षात समजलं की नेमकी माउंटन बाइकिंग काय असते.”

Award Banner

“जेव्हा आम्ही त्या डोंगरावरून जात होतो तेव्हा मी खूप घाबरले होते. डोंगरांवरून खाली पाहिल्यानंतर मला खूप भीती वाटली होती. काहीवेळाने मी नेनेंना सांगितलं की हे सगळं माउंटन बाइकिंग वगैरे मी आधी कधीच केलं नव्हतं. तेव्हा ते आश्चर्यचकित झाले होते.”

दरम्यान, माधुरी दीक्षितच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर, नुकतीच ती ‘मिसेस देशपांडे’ सीरिजमध्ये झळकली होती. आता आगामी काळात ती ‘माँ बहन’ या बहुप्रतिक्षित वेब सीरिजमध्ये झळकणार आहे.