Madhuri Dixit And Sonali Bendre : अभिनेत्री माधुरी दीक्षित होस्ट करत असलेला ‘कोण होणार करोडपती’ हा कार्यक्रम येत्या १२ ऑक्टोबरपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यंदा या शोमध्ये एका एपिसोडसाठी बॉलीवूड अभिनेत्री सोनाली बेंद्रे उपस्थिती लावणार आहे. माधुरी आणि सोनाली या दोघींनी आजवर अनेक ब्लॉकबस्टर सिनेमांमध्ये काम केलेलं आहे. मात्र, या दोघींनी आजवर कधीच एकत्र काम केलेलं नाही. त्यामुळे करोडपतीच्या मंचावर एकत्र येताच या दोघींनी मिळून सिनेलेखकांना खास आवाहन सुद्धा केलं आहे.

सोनाली म्हणते, “I Just Love Her! मला असं वाटतं की, माधुरीजी जे काही करतात ते छानच करतात. खरंतर मी त्यांची खूप मोठी चाहती आहे, फॅन आहे मी त्यांची…आणि माझ्यासाठी सर्वात जास्त छान गोष्ट आहे ती म्हणजे, माधुरी मॅमचा धाकटा मुलगा आणि माझा मुलगा हे दोघंही शाळेत एकाच वर्गात आहेत. त्यामुळे शाळेत आम्ही एकमेकींना पालक म्हणून भेटतो. आता मी जेव्हा कोण होणार करोडपतीच्या सेटवर मी त्यांना भेटेन तेव्हा आणखी काही छान आठवणी तयार होतील असं मला वाटतं.”

‘कोण होणार करोडपती’च्या सेटवर माधुरी दीक्षित म्हणाली, “मी आणि सोनालीने आजवर एकाही चित्रपटात एकत्र काम केलेलं नाहीये. पण, अजूनही उशीर झालेला नाहीये. आज आम्ही दोघी कोण होणार करोडपतीच्या सेटवर एकत्र आलो आहोत…हा माझ्यासाठी खरंच एक आनंदाचा क्षण आहे.”

पुढे सोनाली म्हणाली, “माधुरीजींचा धाकटा मुलगा आणि माझा मुलगा दोघंही एकाच शाळेत आहे त्यामुळे अनेकदा आमची भेट होत असते. पण, आम्ही पडद्यावर कधीच एकत्र काम केलेलं नाहीये. मी त्यांच्या अभिनयाची, डान्सची खूप मोठी फॅन आहे. जर कोणतेही लेखक, दिग्दर्शक आम्हाला पाहत असतील तर, प्लीज आमच्यासाठी स्क्रिप्ट लिहा…मला माधुरीजींबरोबर काम करायला खूप आवडेल.”

दरम्यान, हा शो येत्या १२ ऑक्टोबरपासून सुरू होईल. यंदा पहिल्यांदा ‘करोडपती’ हा शो एक अभिनेत्री होस्ट करणार आहे. महानायक अमिताभ बच्चन यांनीही माधुरीला या नव्या प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.