Madhuri Dixit Andheri House : माधुरी दीक्षितने १९८४ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘अबोध’ चित्रपटातून बॉलीवूडमध्ये एन्ट्री घेतली होती. आज जगभरात तिला ‘धकधक गर्ल’ म्हणून ओळखलं जातं पण, हीच स्टार अभिनेत्री एकेकाळी अंधेरीतल्या जे.बी.नगर परिसरात राहायची. याचठिकाणी तिचं संपूर्ण बालपण गेलं. अगदी ‘तेजाब’ प्रदर्शित झाल्यावरही अभिनेत्री याच घरात राहायची. पण, ‘तेजाब’ सिनेमाने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड ब्रेक कामगिरी केल्यामुळे माधुरीची लोकप्रियता सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढली. चाहते थेट तिच्या घरापर्यंत येऊ लागले, त्यावेळी सुरक्षेच्या कारणास्तव दीक्षित कुटुंबीय दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट झाले.
‘सोनी मराठी’ने त्यांच्या इन्स्टाग्रामवर माधुरीच्या अंधेरीतल्या जे.बी.नगरच्या घराची झलक सर्वांना दाखवली आहे. या घरातील प्रशस्त गॅलरी तेव्हा माधुरीची सर्वात आवडती जागा होती. याशिवाय तिच्या या जुन्या घराशेजारीच एक मैदान आहे. ‘राम लखन’ सिनेमा सुपरहिट ठरल्यावर अभिनेत्री याठिकाणी आपल्या चाहत्यांना भेट देण्यासाठी पोहोचली होती. तेव्हा माधुरीला पाहण्यासाठी संपूर्ण मैदानात गर्दी झाली होती, असं तिच्या शेजारी राहणाऱ्या गृहस्थांनी सांगितलं.

माधुरी या घराबद्दल सांगते, “माझ्या खूप आठवणी या घराबरोबर जोडल्या गेल्या आहेत. तेव्हाचा काळ फार वेगळा होता. आमचे जे शेजारी होते, ते सुद्धा अगदी आम्हाला कुटुंबासारखे होते. सगळ्यांना माहिती असायचं की, कोणाच्या घरी नेमकं काय सुरुये. आम्ही एकमेकांच्या घरी जेवायला जायचो. एकंदर सगळं छान खेळीमेळीचं वातावरण होतं. आताच्या काळात अशी नाती पाहायला मिळत नाहीत. आता आपण अशा घरांमध्ये राहतो, जिथे आपल्याला शेजारी कोण राहतंय हे सुद्धा माहिती नसतं. जे.बी.नगरमध्ये ते एक कौटुंबिक वातावरण होतं, ते फार कमाल होतं. ‘तेजाब’ प्रदर्शित झाल्यावर आम्ही ते घर सोडलं. कारण, तिथे चाहते थेट घरी येऊ लागले होते, घरी आल्यावर सांगायचे…’मॅडमने आम्हाला बोलावलंय, त्या आम्हाला दत्तक घेणार आहेत’ मग, सुरक्षेच्या कारणास्तव आम्हाला दुसरीकडे शिफ्ट व्हावं लागलं. पण, आजही जे.बी.नगरची आठवण येते, तेव्हा चेहऱ्यावर आपोआप हसु उमटतं.”
माधुरी दीक्षित आता लवकरच ‘कोण होणार करोडपती’चा नवा सीझन होस्ट करणार आहे. येत्या १२ ऑक्टोबरपासून प्रेक्षकांना सोनी मराठीवर रात्री ९ वाजता हा शो पाहता येईल. KBC पहिल्यांदाच एक अभिनेत्री होस्ट करत असल्याने, सध्या संपूर्ण कलाविश्वातून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव करण्यात येत आहे.
