Madhuri Dixit Birthday special : बॉलीवूडची धकधक गर्ल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माधुरी दीक्षितने एक काळ गाजवला आहे. तिच्या अदा, सौंदर्य आणि जिवंत अभिनय यामुळे माधुरी अल्पावधीत प्रचंड लोकप्रिय झाली. १९८४ साली प्रदर्शित झालेल्या ‘अबोध’ या चित्रपटातून तिने बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर तिने सिनेविश्वावर राज्य केले. असा एक काळ होता जेव्हा माधुरीचा चित्रपट प्रदर्शित झाला की दररोज थिएटरबाहेर हाऊसफुलचे पोस्टर लागायचे. शुक्रवारी (१५ मे २०२६) माधुरी दीक्षित तिचा ५९ वा वाढदिवस साजरा करणार आहे. यानिमित्ताने माधुरीच्या आयुष्यातील काही रंजक गोष्टी जाणून घेऊ.

लहानपणापासून नृत्याची आवड

माधुरी दीक्षित यांचा जन्म १५ मे १९६७ रोजी मुंबईमध्ये झाला. सामान्य मराठी कुटुंबामध्ये जन्मलेली माधुरी स्वभावाने शांत असली तरी तिच्यामध्ये तेज होते. लहानपणापासून नृत्याची आवड असलेल्या माधुरीने कथक करण्यास सुरुवात केली. वयाच्या अवघ्या नवव्या वर्षी माधुरीने कथकमध्ये स्कॉलरशिप मिळवली होती.

बॉलीवूडमध्ये डान्सरमधून विशेष ओळख

बाळाचे पाय पाळण्यात दिसतात, त्याप्रमाणे माधुरीने तिच्या नृत्यकौशल्याने लहानपणापासून सर्वांचे लक्ष वेधले होते. पुढे बॉलीवूडमध्ये काम करताना माधुरीने जितके अभिनेयातून प्रेक्षकांची मने जिंकली, तितकीच ती तिच्या डान्ससाठी ओळखली गेली. अभिनय, नृत्य आणि तिने साकारलेल्या विविध भूमिका यामुळे माधुरी बॉलीवूडमधील यशस्वी अभिनेत्री ठरली.

माधुरी दीक्षित लहानपणापासून नृत्य शिकत असली तरी त्या अभ्यासातही हुशार होती. शालेय शिक्षणामध्ये त्यांनी चांगली कामगिरी केली होती. तसेच पुढे त्यांनी पार्ले कॉलेजमध्ये मायक्रोबायोलॉजी विषयात पदवी शिक्षणासाठी प्रवेश घेतला होता. मात्र नशीबाने माधुरी दीक्षित यांच्या नशिबी शैक्षणिक नाही तर कला आणि अभिनय विश्वातील उज्ज्वल यश लिहिले होते. शिक्षणामध्ये रुची असलेल्या माधुरीला सिनेमांमुळे शिक्षण सोडावे लागले. तिला पुढे आणखी शिक्षण घ्यायचे होते. माधुरी दीक्षितला अभिनेत्री नाही तर पॅथोलॉजिस्ट व्हायचे होते. मात्र तिच्या नशिबात सिनेविश्वात स्वतंत्र्य ओळख निर्माण करणे लिहिले होते.

‘तेजाब’ आणि त्यानंतर ‘राम लखन’ या चित्रपटाने माधुरी दीक्षितला बॉलिवूडची दिग्गज आणि लोकप्रिय अभिनेत्री बनवले. १९९२ सालच्या ब्लॉकबस्टर चित्रपट ‘बेटा’मधील ‘धक धक करने लगा’ गाण्याने माधुरीला वेगळ्याच उंचीवर नेले. या प्रसिद्ध गाण्यामुळे माधुरी दीक्षितला ‘धक धक गर्ल’ असे नाव मिळाले. या गाण्यातील तिच्या अप्रतिम नृत्य शैलीने आणि मनमोहक अदाकारीने तिला एका रात्रीत स्टार बनवले.

दरम्यान, माधुरी दीक्षितचा चाहतावर्ग मोठा आहे. तिच्या वाढदिवसानिमित्त चाहते सोशल मीडियावर तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करताना दिसत आहेत.