Madhuri Dixit Birthday Actress Once Shared a scary real life experience : माधुरी दीक्षित आजही आपल्या अभिनय, नृत्य आणि मोहक व्यक्तिमत्त्वामुळे चाहत्यांच्या मनावर राज्य करत आहे. ९० च्या दशकात अनेक सुपरहिट चित्रपट देणाऱ्या माधुरीने आपल्या मेहनतीच्या जोरावर इंडस्ट्रीत वेगळी ओळख निर्माण केली. आजही अभिनेत्री मनोरंजनविश्वात सक्रिय असून वेगवेगळ्या कलाकृतीमधून प्रेक्षकांच्या भेटीला येत असते.

माधुरी दीक्षित हल्ली सोशल मीडियावरही फार सक्रिय असते आणि तिच्या दैनंदिन जीवनातील घडामोडी ती यामार्फत शेअर करत असते. अनेक मुलाखतींमधून ती तिच्या आयुष्यातील गमतीशीर किस्से सांगत असते आणि मनमोकळेपणाने बोलताना दिसते. त्यामुळेच तिच्या या साध्या आणि आपलसं करणाऱ्या स्वभावामुळे तिच्या चाहत्यांना ती खूप आवडते. पण एकदा माधुरीने तिच्याबरोबर घडलेला एक भयंकर अनुभव सांगितला होता. अभिनेत्रीच्या घरी पाच अनोळखी मानसं घुसली होती. हा किस्सा नेमका काय आहे याबद्दल जाणून घेऊयात…

माधुरी दीक्षित आज १५ मे रोजी तिचा ५९ वा वाढदिवस साजरा करत आहे. यानिमित्ताने तिच्या खासगी आयुष्यातील एक रंजक किस्सा पुन्हा चर्चेत आला आहे. २०२२ मध्ये माधुरी नेटफ्लिक्सवरील ‘द फेम गेम’ (The Fame Game) या सीरिजच्या प्रमोशनसाठी कपिल शर्माच्या शोमध्ये पोहोचली होती. त्यावेळी तिने एका अनोळखी व्यक्तीशी संबंधित धक्कादायक अनुभव सांगितला होता. माधुरीच्या घरात एक अनोळखी व्यक्ती शिरली होती आणि तो बाहेर जाण्याचे नावच घेत नव्हता, असा खुलासा अभिनेत्रीने केला होता.

माधुरीने सांगितला ‘तो’ अनुभव

माधुरी याबद्दल म्हणालेली, “एकदा माझ्या घरातील स्विचबोर्ड खराब झाला होता. तो दुरुस्त करण्यासाठी काही लोक घरी आले होते. दुर्दैवाने त्या वेळी मी घरीच होते. छोटासा स्विचबोर्ड होता, पण तो ठीक करण्यासाठी चार लोक आले होते. त्यांच्या मागे आणखी एक अनोळखी माणूसही आला होता. त्यांनी मला विचारलं, कोणता स्विचबोर्ड दुरुस्त करायचा आहे? मी त्यांना तो दाखवला. त्यानंतर एक जण स्विचबोर्ड उघडत होता, दुसरा त्याकडे पाहत होता, तर बाकीचे दोन जण तो दुरुस्त करत होते. काम पूर्ण झाल्यावर मी त्यांना सांगितलं, आता सगळं ठीक आहे, तुम्ही जाऊ शकता. चार जण बाहेर गेले, पण पाचवा माणूस मात्र तिथेच थांबला.”

किस्सा सांगताना माधुरी दीक्षित पुढे म्हणाली, “मी थोडी घाबरले होते. मी त्या व्यक्तीला विचारलं, काय झालं? तुम्ही त्यांच्याबरोबर जात नाही आहात का? त्यावर तो माणूस हसत म्हणाला, कुठे? मी त्यांच्याबरोबर नाही आलो, मी तर तुम्हाला पाहायला आलो होतो. तो फक्त त्या लोकांबरोबर माझ्या घरात शिरला होता.”

सिनेमांसह ओटीटीवरही माधुरीची जादू

माधुरी दीक्षितने ‘हम आपके हैं कौन’, ‘खलनायक’, ‘राम लखन’, ‘तेजाब’, ‘दिल’, ‘दिल तो पागल है’, ‘बेटा’, ‘कलंक’ आणि अलीकडे प्रदर्शित झालेल्या ‘भूल भुलैया ३’ सारख्या अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये काम केले आहे.

आजही इतकी वर्षे काम केल्यानंतर माधुरी अभिनय क्षेत्रात सक्रिय असून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. सिनेमांबरोबरच तिने ओटीटी विश्वातही स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. ‘द फेम गेम’नंतर तिने ‘मिसेस देशपांडे’ या क्राइम-थ्रिलर सीरिजमध्ये सिरीयल किलरची दमदार भूमिका साकारली होती.

याशिवाय माधुरी लवकरच ‘माँ बेहेन’ Maa Behen या डार्क-कॉमेडी चित्रपटात झळकणार आहे. हा चित्रपट लवकरच नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.