अभिनेत्री माधुरी दीक्षित व तिचे पती डॉ. श्रीराम नेने नुकतेच मुख्यमंत्र्याच्या वर्षा निवासस्थानी त्यांची भेट घेण्यासाठी पोहोचले होते. या भेटीदरम्यानचे खास फोटो डॉ. नेनेंनी इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. गेल्या काही दिवसांपासून डॉ. श्रीराम नेने ’21 Days to Good Health’ या त्यांच्या पहिल्या पुस्तकाच्या लॉन्चिंगची तयारी करत आहेत. येत्या १० ऑक्टोबरला हे पुस्तक लॉन्च करण्यात येणार आहे. आपण आपल्या आरोग्याबाबत नेहमीच जागरूक राहिलं पाहिजं. निरोगी आयुष्य कसं जगावं, तुमच्या काही चुकीच्या सवयी भविष्यात तुमच्या आरोग्यासाठी कशाप्रकारे घातक ठरू शकतात. याची माहिती या पुस्तकातून देण्यात आली आहे.

डॉ. श्रीराम नेनेंनी त्यांच्या ’21 Days to Good Health’ या पुस्तकात २१ दिवसांचा दिनक्रम कसा असावा याबद्दल सांगितलं आहे. याचनिमित्ताने नेने आणि माधुरी हे दोघंही मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यासाठी पोहोचले होते.

डॉ. नेने सांगतात, “२१ डेज टू गुड हेल्थ’ हे माझं पहिलं पुस्तक महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांच्यासमोर सादर करताना मला अत्यंत आनंद होत आहे. अलीकडच्या जगात प्रत्येकाने कशाप्रकारे आपल्या आरोग्याला प्राधान्य दिलं पाहिजे, आरोग्यविषयक जागरूकता, आरोग्यसेवेची उपलब्धता, योग्य उपाययोजनांबाबत लोकांना सक्षम करणं, जेणेकरून आजारांवर वेळीच मात करता येईल किंवा आजाराचं वेळेत निदान होईल आणि उपचार वेळेत घेणं शक्य होईल, अशा बऱ्याच विषयांवर आम्ही चर्चा केली. फडणवीसजी, तुम्ही अतिशय छान आणि प्रेमळ आदरातिथ्य केलंत, आपल्याला भेटून माधुरी आणि मला आम्हा दोघांनाही छान वाटलं. आपण आपला मौल्यवान वेळ दिलात, याबाबत मी आपला नेहमीच आभारी आहे.”

नेनेंनी शेअर केलेल्या फोटोंमध्ये ते मुख्यमंत्र्यांना त्यांच्या पुस्तकाबाबतची माहिती देत असल्याचं पाहायला मिळत आहे. दरम्यान, सोशल मीडियावर सध्या यांच्या भेटीचे फोटो तुफान व्हायरल होत आहेत.

माधुरीच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर, येत्या १२ ऑक्टोबरपासून ती ‘कोण होणार करोडपती’ हा शो होस्ट करणार आहे.