माधुरी दीक्षितने आजवर अनेक चित्रपटांमधील गाण्यांमधून तिच्या नृत्यकौशल्याने अनेकांची पसंती मिळवली आहे. त्यापैकीच एक म्हणजे ‘एक दो तीन’ हे अल्का याज्ञिक यांनी गायलेलं गाणं. परंतु, अनेकांना माहीत नसेल अल्का याज्ञिक यांना माधुरी या गाण्याला न्याय देऊ शकेल याबद्दल साशंकता होती. परंतु, नंतर माधुरीचं सादरीकरण पाहिल्यानंतर त्या अवाक झाल्याचं त्यांनी सांगितलं.
अल्का याज्ञिक यांनी ‘तेजाब’ चित्रपटातील ‘एक दो तीन’ गाण्याला माधुरी न्याय देऊ शकेल असं त्यांना वाटलं नव्हतं कारण त्यावेळी तिची शरीरयष्टी नाजूक होती आणि ती खूप शांत स्वभावाची आहे असं त्यांना वाटलं होतं. त्यामुळे गाणं खूप जबरदस्त असून त्यावर सादरीकरण करण्यासाठी खूप ऊर्जा लागेल, ती हे करू शकेल का अशी शंका त्यांना होती असं त्यांनी ‘बॉलीवूड बबल’ला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे.
‘एक दोन तीन’ गाण्यासाठी माधुरी दीक्षित योग्य वाटत नव्हती
अल्का याज्ञिक यांनी दोन वर्षांपूर्वी दिलेल्या या मुलाकतीत सांगितलेलं की, “माधुरी रेकॉर्डिंगसाठी आली होती. त्यावेळ ती नवीन असल्याने मी तिला आधी कुठेच पाहिलं नव्हतं. ती आली आणि ती शांतपणे बसली होती. मला लाजाळू वाटली. खूप बारीक होती. कोणीतरी तिची आणि माझी भेट घडवून दिली तेव्हा आणि ओळख करुन देताना सांगितलं की ही माधुरी दीक्षित आहे आणि हिच्यावर तुमचं गाणं चित्रित होणार आहे. ती नवीन मुलगी आहे. मी विचार केला ही हे गाणं कसं गाणार कारण गाणं खूप जबरदस्त आहे. लटके -झटके आहेत. यासाठी खूप ऊर्जा लागेल ती कुठून आणणार पण, जेव्हा मी तिला स्क्रीनवर पाहिलं तेव्हा तिने खूप प्रभावी काम केल्याचं जाणवलं.”

त्या पुढे म्हणाल्या, “तिने खूप चांगलं काम केलं. जेव्हा जादू घडायची असते तेव्हा प्रत्येक गोष्ट जुळून येते.” १९८८मध्ये प्रदर्शित झालेल्या या गाण्याची कोरिओग्राफी सरोज खान यांनी केली होती. तर हे गाणं जावेद अख्तर यांनी लिहिलं होतं आणि लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी संगीतबद्ध केलं होतं.
दरम्यान, ‘तेजाब’पूर्वी माधुरीने १९८४मधील ‘अबोध’ या चित्रपटातून पदार्पण केलं होतं. मात्र तिला पहिल्यांदा लोकप्रियता मिळली ते ‘तेजाब’ या चित्रपटामुळेच. त्यानंतर तिने अनेक हिट चित्रपट दिले आणि अनेक लोकप्रिय कलाकारांसह काम केलं. सध्या ती कोण होणार करोडपतीमध्ये सूत्रसंचालन करत आहे.
