Madhuri Dixit Had To Take Permission Before Entering Bollywood : माधुरी दीक्षित बॉलीवूडमधील ९०च्या काळातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. आजही माधुरीची क्रेझ प्रेक्षकांमध्ये कायम असून तिला नवीन भूमिकेतून पाहण्यासाठी चाहते उत्सुक असतात.
माधुरीने आजवर अनेक चित्रपटांत विविध भूमिका साकारत तिच्या सहज सुंदर अभिनयाने आणि सौंदर्याने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. अशातच आता ती पहिल्यांदाच एका आगळ्या वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. ती पहिल्यांदाच वेब सीरिजच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
माधुरीचे चाहते तिच्या या नवीन प्रोजेक्टची आतुरतेने वाट पाहत आहेत. पण, तुम्हाला माहितीये का ज्या माधुरी दीक्षितने देशभरातील प्रेक्षकांना तिच्या अभिनय कौशल्याने आपलंसं केलं होतं तिला या इंडस्ट्रीत पदार्पण करण्यापूर्वी एका महत्त्वाच्या व्यक्तीची परवानगी घ्यावी लागली होती. याबद्दल तिने स्वतः सांगितलं आहे. माधुरीने नुकतीच ANI ला मुलाखत दिली असून यामध्ये तिने तिचे पती, मुलं, इंडस्ट्रीतील कलाकार आणि चित्रपट या सगळ्यांबद्दल सांगितलं आहे.
माधुरी दीक्षितला ‘या’ व्यक्तीकडून घ्यावी लागलेली परवानगी
माधुरीला मुलाखतीत, ‘तू अशा पद्धतीच्या कुटुंबातून येतेस जिथे चित्रपटांमध्ये काम करणं मोठी गोष्ट असून तुझ्यासाठी हे आव्हानात्मक राहिलं असेल’ असं विचारल्यानंतर ती म्हणाली, “हो, ही एक मोठी गोष्ट होती आणि माझ्या आईचं कुटुंब खूप जुनाट विचारसरणीचं होतं, बाबांकडेही असंच वातावरण होतं, पण बाबांकडे थोडी मुभा होती. पण, आईच्या माहेरचे असे होते की आम्हाला त्यांची परवानगी घ्यावी लागायची आणि त्यावेळी माझ्या पणजी होत्या, त्यामुळे आम्हाला त्यांच्याकडे जाऊन याबद्दल बोलावं लागलं; कारण त्यावेळी त्या घरातील सर्वात ज्येष्ठ व्यक्ती होत्या.”
माधुरी पुढे म्हणाली, “त्या खूप पुरोगामी विचारांच्या होत्या. त्या म्हणालेल्या, मी तिला नृत्य करताना पाहिलं आहे आणि ती खूप हुशार आहे. तिने असंच काहीतरी केलं पाहिजे. तिने तिच्याकडे असलेल्या कलेच्या माध्यमातून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं पाहिजे आणि मला खात्री आहे की तिने जर मेहनत घेतली तर ती खूप छान काम करेल, मग परवानगी मिळाल्यानंतर मी ठरवलं की मला हेच करायचं आहे.”
