माधुरी दीक्षित आणि डॉ. श्रीराम नेने यांच्याकडे मनोरंजन विश्वातील आदर्श जोडी म्हणून पाहिलं जातं. लोकप्रियतेच्या शिखरावर असताना ‘धकधक गर्ल’ने डॉ. नेनेंशी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, तुम्हाला माहितीये का? लग्न जमण्याआधी डॉ. नेने माधुरीला ओळखत नव्हते. ती इतकी प्रसिद्ध अभिनेत्री आहे हे सुद्धा त्यांना माहिती नव्हतं.
प्रसिद्ध लेखिका-निवेदिका वसुंधरा काशीकर यांनी याबद्दलचा किस्सा सांगितला आहे. त्या सांगतात, “माधुरी दीक्षितचे पती डॉ. श्रीराम नेने यांना मी एका मुलाखतीत प्रश्न विचारला होता की, उद्या तुम्ही कितीही पैसा कमवला किंवा कितीही उत्तम शस्त्रक्रिया केल्या तरी, जेव्हा माधुरी आणि तुम्ही ( नेने ) दोघं एकत्र उभे असाल, तेव्हा लोक सही मात्र माधुरी दीक्षितकडूनच घेतील. त्यामुळे प्रसिद्ध किंवा लोकप्रियतेच्या शिखरावर असलेल्या अभिनेत्रीशी जेव्हा तुम्ही लग्न करता तेव्हा मनात काय भावना असते? यावर त्यांनी अतिशय सुंदर उत्तर दिलं होतं.
“डॉ. श्रीराम नेने यावर म्हणाले होते, मला माहितीच नव्हतं की तिची लोकप्रियता एवढ्या मोठ्या प्रमाणात आहे. ती ‘द माधुरी दीक्षित’ आहे याबद्दल मला काहीच कल्पना नव्हती.
वसुंधरा काशीकर पुढे सांगतात, “डॉ. नेनेंना मी दुसरा प्रश्न असाही विचारला होता की, सर्वांच्या मनात माधुरी असते, तुमच्या मनात कुणी दुसरी कधी आलीये का?
“यावर श्रीराम नेने लगेच म्हणाले होते, नाही नाही अजिबातच नाही! त्यावेळी आमच्यासमोर साधारण १० हजारांचा समुदाय उपस्थित होता. त्यातील एक जण म्हणाला, नेने तुम्ही पॉलिटिकली करेक्ट उत्तर देत आहात…आता खरं-खरं उत्तर सांगा. तेव्हा मग माधुरी मध्येच म्हणाली होती, “नाही ते श्रीराम आहेत.” हा किस्सा वसुंधरा काशीकर यांनी यशस्वी उद्योजकला दिलेल्या मुलाखतीत सांगितला आहे.
