Madhuri Dixit : माधुरी दीक्षित सध्या ‘कोण होणार करोडपती’ या शोमुळे चर्चेत आली आहे. KBC च्या मराठी सीझनच्या होस्टिंगची जबाबदारी यंदा माधुरी दीक्षितवर सोपवण्यात आली आहे. पहिल्यांदाच ‘कोण होणार करोडपती’ हा शो एक अभिनेत्री होस्ट करणार आहे. माधुरीच्या रॉयल एन्ट्रीचा प्रोमो नुकताच प्रेक्षकांसमोर आला आहे. लवकरच ‘सोनी मराठी’ वाहिनीकडून ‘कोण होणार करोडपती’ची लॉन्च डेट जाहीर केली जाईल. मात्र, त्याआधी सध्या संपूर्ण मनोरंजन विश्वातून माधुरीवर या नव्या प्रोजेक्टसाठी शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे.
९० च्या दशकातील सुपरस्टार अभिनेत्री तसेच प्रेक्षकांची लाडकी ‘धकधक गर्ल’ म्हणून माधुरीला ओळखलं जातं. ‘धकधक गर्ल’च्या साथीने आता ‘कोण होणार करोडपती’मध्ये एका नव्या अध्यायाची सुरुवात होणार आहे. माधुरी शोचं होस्टिंग करणार हा सर्वांसाठीच सुखद धक्का आहे.
माधुरीचे पती डॉ. नेनेंनी देखील माधुरीचं ‘कोण होणार करोडपती’चं पोस्टर पाहून तिचं खास कौतुक केलं आहे. श्रीराम नेनेंनी पाच शब्दांत आपली प्रतिक्रिया दिली आहे. “Right On! What a Perfect Fit” असं नेनेंनी बायकोचं कौतुक करत म्हटलं आहे. म्हणजेच, होस्ट म्हणून अगदी योग्य व्यक्तीची निवड केलीय असं नेनेंना आपल्या पोस्टद्वारे सूचित करायचं आहे.
डॉ. श्रीराम नेने प्रत्येक गोष्टीत आपल्या बायकोला खंबीरपणे साथ देताना दिसतात. माधुरीसह अनेक इव्हेंट्स, अवॉर्ड शो, पार्ट्यांना देखील ते उपस्थित असतात. माधुरीप्रमाणे चाहते डॉ. नेनेंचं सुद्धा भरभरून कौतुक करत असतात.

दरम्यान, या नव्या प्रवासाविषयी बोलताना माधुरी दीक्षित म्हणाली, “कोण होणार करोडपती’ हा केवळ एक कार्यक्रम नाही, तर महाराष्ट्रातल्या लाखो कुटुंबांच्या आशांचा, स्वप्नांचा आणि ज्ञानावरच्या विश्वासाचा उत्सव आहे. अशा प्रतिष्ठित मंचाचा भाग होण्याची संधी मिळणं हा माझ्यासाठी अत्यंत आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण आहे. एक महाराष्ट्रीय म्हणून या मंचावर येणाऱ्या प्रत्येक स्पर्धकाच्या जिद्दीचा, संघर्षाचा आणि त्याच्या स्वप्नांचा प्रवास जवळून अनुभवण्याची, त्यांच्या आयुष्यातल्या महत्त्वाच्या क्षणांची साक्षीदार होण्याची संधी मला मिळतेय… याचा मला विशेष आनंद आहे आणि या नव्या प्रवासाची सुरुवात करण्यासाठी मी खूप उत्सुक आहे.”
