Madhuri Dixit Husband : बॉलीवूडची स्टार अभिनेत्री माधुरी दीक्षितने १९९९ मध्ये डॉ. श्रीराम नेनेंशी लग्न केलं. या दोघांचा विवाहसोहळा अमेरिकेत मराठमोळ्या पद्धतीत पार पडला होता. खरंतर, नेनेंचा जन्म लंडनमध्ये झाला आणि त्यानंतर ते आपल्या कुटुंबासह अमेरिकेत राहायला आले. याचठिकाणी त्यांनी आपलं वैद्यकीय शिक्षण सुद्धा पूर्ण केलं. लग्नानंतर माधुरी देखील अमेरिकेत शिफ्ट झाली. अनेक वर्षे अमेरिकेत राहिल्यावर या जोडप्याने २०११ मध्ये कायमस्वरुपी भारतात परतण्याचा निर्णय घेतला.
डॉ. श्रीराम नेनेंनी अमेरिकेतील हार्ट सर्जनची नोकरी सोडून भारतात येण्याचं ठरवलं, तेव्हा त्यांचे आई-बाबा सुरुवातीला प्रचंड नाराज झाले होते. आपल्या मुलाने इंजिनिअर अथवा वैद्यकीय क्षेत्रात करिअर करावं अशी त्यांच्या आई-बाबांची मनापासून इच्छा होती…आणि ती इच्छा पूर्ण देखील झाली. याबद्दल, माधुरीच्या नवऱ्याने स्वत: खुलासा केला आहे. ते INKtalks च्या पॅनलवर बोलत होते.
डॉ. श्रीराम नेने सांगतात, “माझ्या आई-बाबांनी मला सुरुवातीलाच सांगितलं होतं की, तू एकतर डॉक्टर हो किंवा इंजिनिअर हो…अन्यथा आम्ही तुझ्या शिक्षणासाठी खर्च करणार नाही. माझे आई-बाबा आधीच्या पिढीतील असल्याने साहजिकच त्यांची विचारसरणी त्यावेळी थोडी वेगळी होती. त्यानंतर मी वॉशिंग्टन विद्यापीठात अंडरग्रॅजुएट मेडिसिन प्रोग्राममध्ये प्रवेश घेतला. त्याठिकाणी शिक्षण पूर्ण करून, UCLA ( युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया ) मध्ये प्रवेश घेतला. UCLA मध्ये मी माझं जनरल आणि व्हॅस्क्युलर सर्जरीचं शिक्षण पूर्ण केलं. पुढे, मग फ्लोरिडा विद्यापीठात मी प्रॅक्टिस सुरू केली.”
यानंतर डॉ. श्रीराम नेनेंनी अमेरिकेत अनेक वर्षे काम केलं. मात्र, काही वर्षांनी त्यांनी हार्ट सर्जनची नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला. परदेशातील नोकरी सोडून त्यांनी वैद्यकीय सल्लागार व उद्योजक म्हणून काम करण्यास सुरुवात केली, ते २०११ मध्ये भारतात आले. हा निर्णय त्यांच्या आई-वडिलांना म्हणजेच माधुरीच्या सासू-सासऱ्यांना पटला नव्हता.
यावर नेने सांगतात, “हार्ट सर्जनची नोकरी सोडणं… हा खूप मोठा निर्णय होता…कित्येकांचं हे स्वप्न असतं, त्यामुळे या निर्णयावर तेव्हा माझे आई-वडील नक्कीच खूश नव्हते. पण, हळुहळू मी आता जे-जे काही करतोय, वैद्यकीय क्षेत्रात सल्लागार म्हणून काम करतोय हे सगळं पाहून त्यांना आता हा निर्णय पटलेला आहे. असंख्य लोकांसाठी सल्लागार म्हणून काम करणं हे माझं स्वप्न होतं…म्हणून मी नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला. पारंपरिक आरोग्य सेवा महत्त्वाच्या असतात पण, त्याच्या जोडीने आपण तंत्रज्ञानाच्या साथीने लोकांना घरबसल्या देखील अनेक माहिती पुरवू शकतो असा विचार माझ्या मनात आला…मग युट्यूब चॅनेल सुद्धा सुरू केलं.” डॉ. नेनेंचं स्वत:चं युट्यूब चॅनेल सुद्धा आहे. यावर ते अनेक हेल्दी रेसिपीजचे व्हिडीओ बनवून शेअर करत असतात.
दरम्यान, माधुरी व डॉ. श्रीराम नेने यांच्या मुलांची नावं अरिन-रायन अशी आहेत. २०११ मध्ये माधुरी आपल्या कुटुंबासह भारतात परतली आणि मुंबईत स्थायिक झाली.
