Dr Shriram Nene Tea Coffee Warning: बॉलीवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षितचे पती आणि प्रसिद्ध कार्डिओथोरॅसिक सर्जन डॉ. श्रीराम नेने यांनी आपल्या सोशल मीडियावर आरोग्याशी संबंधित एक महत्त्वपूर्ण इशारा दिला आहे. भारतीय घरांमध्ये अत्यंत आवडीने प्यायल्या जाणाऱ्या चहा आणि कॉफीच्या चुकीच्या पद्धतीमुळे अन्ननलिकेचा कर्करोग (Esophageal Cancer) होण्याचा धोका तब्बल तीन पटीने वाढू शकतो, असा खुलासा त्यांनी केला आहे. ‘इंटरनॅशनल जर्नल ऑफ कॅन्सर २०२६’ मधील ९ लाखांहून अधिक लोकांवर केलेल्या १० वर्षांच्या अभ्यासाचा हवाला देत डॉ. नेने यांनी हा धोका टाळण्यासाठी चहा पिण्याची योग्य पद्धत सांगितली आहे.

चहा-कॉफी पिण्यामुळे अन्ननलिकेचा कॅन्सर होण्याचा धोका – डॉ. श्रीराम नेने

तुमचा चहा वाईट नाही, पण त्याचे तापमान असू शकते, असं डॉ. श्रीराम नेने म्हणाले.

युकेमधील ९,७७,२८२ प्रौढ व्यक्तींचा १० वर्षांपेक्षा जास्त काळ अभ्यास करून एक संशोधन करण्यात आलं. त्यातून एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे -जी वाचून तुमचा चहा थोडा वेळ थंड होऊ देणं तुमच्या आरोग्यासाठी नक्कीच फायद्याचं ठरेल. ज्या लोकांना अतिशय गरम चहा किंवा कॉफी पिण्याची सवय आहे, त्यांना कोमट किंवा मध्यम गरम पेय पिणाऱ्यांच्या तुलनेत अन्ननलिकेचा कर्करोग (Oesophageal Squamous Cell Carcinoma – SCC) होण्याचा धोका सुमारे ३ पटीने जास्त असतो.

चहा-कॉफीचं तापमानही जाऊद्या, पण दिवसातून ६ किंवा त्याहून अधिक कप अतिशय गरम पेये पिणाऱ्यांमध्ये हा कर्करोग होण्याचा धोका ७१% जास्त आढळून आला आहे. हा एक निरीक्षणावर आधारित अभ्यास होता. त्यामुळे हे संशोधन अतिगरम पेये आणि कर्करोगाचा धोका यांमधील संबंध दर्शवते, पण गरम पेयांमुळेच थेट कर्करोग होतो असा ठाम पुरावा नाही.

या अभ्यासाचा सोपा आणि महत्त्वाचा निष्कर्ष एवढाच की,

१. चहा पिण्यास घाबरू नका.

२. कॉफी पिण्यासही घाबरू नका.

३. चहा किंवा कॉफी जीभ किंवा घसा भाजेल इतके गरम असताना पिऊ नका इतकंच.

चहा पिण्याची योग्य पद्धत

डॉ. नेने म्हणतात की, चहा व कॉफी नक्कीच प्या. पण एक घोट घ्या, त्यानंतर थोडं थांबा. चहा-कॉफी थोडे कोमट होऊ द्या मग प्या. कारण कधीकधी एखादी चांगली आणि निरोगी सवय म्हणजे आवडत्या गोष्टी कायमच्या सोडणे, असे नसते तर फक्त एक मिनिट थांबणे असते.

(संदर्भ: पापियर आणि इतर, इंटरनॅशनल जर्नल ऑफ कॅन्सर, २०२६)

तुम्हालाही रोज चहा किंवा कॉफी पिण्याची सवय असेल, तर नक्की प्या. पण डॉ. नेने यांनी सांगितलेल्या या गोष्टीचा नक्की विचार करा आणि कॅन्सरचा धोका टाळण्यासाठी योग्य पद्धतीने प्या.