Madhuri Dixit husband Dr Shriram Nene shares unseen photos: माधुरी दीक्षित सध्या ‘कोण होणार करोडपती’ या शोचे सूत्रसंचालन करत आहे. या शोमध्ये अभिनेत्रीने अनेक किस्से सांगितले. तसेच, काही सिनेमांदरम्यानच्या आठवणी सांगितल्या. या सगळ्यामुळे अभिनेत्री मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे.

आता मात्र बॉलीवूडची धकधक गर्ल तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. माधुरीचे पती डॉक्टर श्रीराम नेने यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत भावना व्यक्त केल्या आहेत. त्यांनी माधुरीबरोबरचे काही खास फोटो शेअर केले आहेत.

डॉक्टर श्रीराम नेने यांची माधुरी दीक्षितसाठी खास पोस्ट

श्रीराम नेने यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर माधुरीबरोबरचे काही जुने अनसीन फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये श्रीराम नेने माधुरीला अंगठी घालत असल्याचे दिसत आहे. याबरोबरच, एका फोटोमध्ये माधुरी त्यांना मिठी मारत असल्याचे दिसत आहे. तसेच, त्यांचे काही हसतानाचेही फोटो पाहायला मिळत आहे. माधुरीने पांढऱ्या रंगाचा ड्रेस परिधान केल्याचे पाहायला मिळत आहे.

हे खास फोटो शेअर करत डॉक्टर श्रीराम नेनेंनी लिहिले, “आजच्याच दिवशी २७ वर्षांपूर्वी बेव्हर्ली हिल्स( Beverly Hills courthouse)च्या न्यायालयात आम्ही एकमेकांना आयुष्यभर साथ देण्याचं वचन दिलं आणि आमच्या आयुष्यातील एका सुंदर प्रवासाला सुरुवात झाली.”

पुढे त्यांनी लिहिले, “आयुष्य आम्हाला कुठे घेऊन जाईल, याची तेव्हा आम्हाला कल्पना नव्हती. पण आयुष्यातील प्रत्येक क्षण आम्हाला एकत्र अनुभवायचा आहे, हे मात्र आम्हाला माहीत होतं. दोन अप्रतिम मुलं, असंख्य आठवणी, काही आव्हानं, खूप आनंद आणि प्रेमाने भरलेला हा प्रवास आयुष्यभरासाठी खूप खास आहे. आज पुन्हा एकदा निवड करण्याची संधी मिळाली, तरी मी तुलाच माझा जोडीदार म्हणून निवडेन.”

शेवटी त्यांनी असेही लिहिले, “आपल्या लग्नाच्या २७व्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. अनंत काळापर्यंत आणि त्याही पलीकडे, आपण असेच एकत्र राहू.”

दरम्यान, माधुरी दीक्षित व डॉक्टर श्रीराम नेने वेळोवेळी एकमेकांबद्दल प्रेम व्यक्त करतात. ते सोशल मीडियावर विविध फोटो शेअर करत असतात.