Madhuri Dixit-Amitabh Bachchan KBC Promo : माधुरी दीक्षित येत्या १२ ऑक्टोबरपासून ‘कोण होणार करोडपती’ या शोची होस्ट म्हणून जबाबदारी सांभाळणार आहे. शो सुरू होण्यापूर्वी अभिनेत्रीने हिंदी KBC च्या मंचावर उपस्थिती लावली होती. यामागचं कारणही खूपच खास होतं, ते म्हणजे येत्या ११ ऑक्टोबरला महानायक अमिताभ बच्चन त्यांचा ८४ वा वाढदिवस साजरा करणार आहेत. याच निमित्ताने KBC च्या मंचावर सुद्धा त्यांच्या वाढदिवसानिमित्त खास सेलिब्रेशन करण्यात आलं. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
अमिताभ बच्चन यांचा बर्थडे सेलिब्रेट करण्यासाठी स्वत: माधुरी दीक्षित KBC च्या मंचावर पोहोचली होती. एन्ट्री घेताना ती म्हणाली, “आपल्या देशात फक्त दोन प्रकारच्या गोष्टी ऐकवल्या जातात. एक म्हणजे…पुस्तकातल्या गोष्टी आणि दुसरी गोष्ट म्हणजे…अमिताभ बच्चन यांच्याबद्दलची! अमितजी आज आपण इथे तुमचा वाढदिवस साजरा करणार आहोत. पिढ्या बदलल्या जातील पण, तुमच्या फॅन फॉलोअर्समध्ये जराही बदल होणार नाही. तुमची लोकप्रियता कायम वाढतच जाईल.” याशिवाय अमितजींसाठी धकधक गर्लने शिट्टीही वाजवली.
KBC च्या मंचावर मिळालेलं सुंदर सरप्राइज पाहून अमिताभ बच्चन सुद्धा भारावून गेल्याचं पाहायला मिळालं. यानंतर माधुरी त्यांना प्रेमाने मराठीत एक प्रश्न विचारते तो म्हणजे, “काय करणार तुम्ही एवढं प्रेम घेऊन?”
अभिनेत्रीचा हा प्रश्न ऐकून अमिताभ बच्चन काहीसे हसतात आणि म्हणतात, “ही सगळी देवाची कृपा आहे…आणि माझे फॅन्सही तसेच आहेत. ज्यादिवशी तुमचं प्रेम मिळणं बंद होईल…त्यादिवशी मी काहीच नसेन…मी सुद्धा बंद होईन.”
पुढे, माधुरी ‘We Love You अमितजी!’ म्हणत त्यांना आणखी एक खास सरप्राइज देते. हे सरप्राइज म्हणजे मंचावर अभिषेक बच्चनची एन्ट्री होते. आपल्या मुलाला पाहताच ‘बिग बी’ त्याला मिठी मारतात. हा सुंदर भावनिक क्षण प्रोमोमध्ये सर्वांचं लक्ष वेधून घेतो.
KBC चा हा विशेष भाग ९ ऑक्टोबरला रात्री सोनी टीव्हीवर प्रसारित केला जाणार आहे. चाहत्यांनी या प्रोमोवर कौतुकाचा वर्षाव करत बिग बींना वाढदिवसाच्या शुभेच्छाही दिल्या आहेत.
