Madhuri Dixit Sonali Bendre : बॉलीवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षितने ‘कोण होणार करोडपती’चे सूत्रसंचालन करण्यास सुरुवात केली आहे. पहिल्यांदाच एक महिला या शोचे सूत्रसंचालन करीत असल्याने चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता होती. ‘कोण होणार करोडपती’चा पहिला एपिसोड रिलीज झाला असून, पहिल्या एपिसोडमध्ये लोकप्रिय अभिनेत्री सोनाली बेंद्रे सहभागी झाली होती. यावेळी सोनाली व माधुरीमध्ये गप्पा रंगल्या असून, सिनेविश्वातील अनुभव शेअर केले गेले.
सोनाली बेंद्रेने तिच्या अदा आणि सौंदर्याने बॉलीवूडचा एक काळ गाजवला आहे. तिच्या अभिनयाबरोबर तिने डान्स केलेली गाणी जबरदस्त लोकप्रिय आहेत. सोनालीचे ‘हम्मा हम्मा’ आणि मराठीतील ‘चम चम करता हैं’ गाणे प्रचंड गाजले होते. त्यातील सोनालीच्या स्टेप्स आणि नृत्य पाहून चाहते अक्षरशः घायाळ झाले होते; पण सोनाली बेंद्रेला डान्स करण्याची भीती वाटत असल्याचे तिने उघड केले आहे.
मी डान्स करणंच बंद केलं – सोनाली
‘कोण होणार करोडपती’मध्ये माधुरी दीक्षितने सोनाली बेंद्रेला डान्सची भीती होती ना? तुला डान्सची रात्रीची भयानक स्वप्नं पडायची ना? त्यावर कशी तू मात केलीस आणि कशी पुढे आलीस? असे प्रश्न विचारताच सोनालीने डोक्याला हात लावला. सोनाली म्हणाली, “मी आजपर्यंत यावर मात करू शकलेच नाहीये; तर मी डान्स करणंच बंद केलं.”
पुढे माधुरी म्हणाली, “‘तू हम्मा हम्मासारखं गाणं केलेलं होतं.’ त्यावर सोनाली म्हणाली, ‘ते त्यावेळी मी कसं केलं मला माहीत नाही.’ पुढे माधुरी म्हणाली, ‘ते ‘हम्मा हम्मा’ गाणं अतिशय जबरदस्त केलं होतंस.’ त्यावर प्रेक्षकांनीही टाळ्या वाजवल्यानंतर सोनाली म्हणाली, ‘माझी कोण होणार करोडपतीच्या निर्मात्यांना एक विनंती आहे. ही क्लिप मला नक्की पाठवा. कारण- यात स्वतः माधुरी दीक्षित माझ्या डान्सची स्तुती करतायेत, ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे आणि हे मला हवंय.'”

या एपिसोडमध्ये सोनालीने मायकल जॅक्सनच्या स्वागतासाठी नऊवारी साडी नेसल्याचा किस्सा सांगितला. सोनाली म्हणाली, “खरं तर मी त्याची चाहती नव्हते. मला त्यांनी म्हटलं होतं की, आम्हाला मराठी मुलगी हवी आहे. त्या वेळेला मला माझ्या कुटुंबासाठी आणि मैत्रिणींसाठी तिकिटे मिळाली आणि नऊवारीबद्दल मला फार उत्सुकता होती माझी आजी नेसायची. त्यामुळे मी खूप उत्सुक होते; पण त्यानंतर जेव्हा मी कॉन्सर्टला गेले ना तेव्हा मला समजलं की, तो किती श्रेष्ठ कलाकार आहे.”
