माधुरी दीक्षितने करिअरच्या शिखरावर असताना लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. १९९९ मध्ये तिने डॉ. श्रीराम नेनेंशी लग्न केलं. दोघांचा विवाहसोहळा अमेरिकेत पार पडला होता. लग्नानंतर ‘धकधक गर्ल’ने अमेरिकेत स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. तिचे पती डॉ. नेने हार्ट सर्जन असल्याने संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी माधुरीने एकटीने सांभाळली होती.
मात्र, माधुरीचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात असल्याने अमेरिकेतही अनेक लोक तिला ओळखत होते. ‘धकधक गर्ल’च्या काही चाहत्यांनी तिच्या डेन्व्हर येथील घराचा शोध घेण्याचा प्रयत्न सुद्धा केला होता. याचा किस्सा अभिनेत्रीने सौम्या टंडनला दिलेल्या मुलाखतीत सांगितला आहे.
माधुरी दीक्षित म्हणते, “अमेरिकेत माझं सर्व छान चालू होतं. मी माझी ओळख सर्वांपासून लपवण्याचा प्रकर्षाने प्रयत्न करत होते. पण, माझ्या काही चाहत्यांना समजलं होतं की, मी डेन्व्हरमध्ये राहते. त्यामुळे त्याकाळी माझे अनेक चाहते आमच्या घराभोवती फिरायचे, गाड्या घेऊन फेऱ्या मारायचे. एखादी गाडी तीन-चारवेळा सलग दिसली की, माझे शेजारी खूप घाबरायचे.”
अभिनेत्री पुढे म्हणाली, “एकदा माझ्या घराच्या गेटबाहेर खूप वेळ एक गाडी उभी होती…आणि त्यातले लोक बराच वेळ आत बसून राहिले होते. त्यावेळी माझ्या शेजारच्यांनी घाबरून मला फोन केला होता आणि ते म्हणाले, ‘मला वाटतंय तुमच्या घराबाहेर काहीतरी घडतंय…एक गाडी खूप वेळ उभी आहे आणि ती गाडी गेल्या ३ तासांपासून हललेली नाहीये. आपण पोलिसांना बोलवूया का? आम्हालाही भीती वाटत आहे.’ मी त्यांना घाबरू नका असं सांगितलं. कारण, मला खात्री होती की, असंच कोणीतरी त्या गाडीत असणार ज्यांना मला पाहायचं असेल.”
माधुरी पुढे सांगते, “मी अमेरिकेत अगदी सामान्य लोकांप्रमाणे जीवन जगले आहे. आम्हा कुटुंबीयांना एकत्र गाडी धुण्याची प्रचंड आवड होती. गाडी धुताना माझ्या मुलांना पाण्यात आणि साबणात खेळायला आवडायचं. एकदा आम्ही असेच सुट्टीच्या दिवशी एकत्र आमची गाडी वॉश करत होतो तेव्हा अचानक काही चाहते घराबाहेर आले. त्यांनी मला पाहिलं आणि लगेच म्हणाले, ‘अरे बघा माधुरी दीक्षित गाडी धुतेय…’ असे बरेच किस्से तेव्हा घडायचे आणि मला काम करताना पाहून माझे चाहते थक्क व्हायचे.”
“भारतात, तुम्ही तुमच्या घरच्या मदतनीसांवर खूप अवलंबून असता. तुम्ही सर्व काही त्यांच्यावर सोपवू शकता, पण अमेरिकेत तसं अजिबात नव्हतं. तुम्हाला स्वयंपाक करावा लागतो, साफसफाई करावी लागते, किराणा सामान खरेदी करावं लागतं, सगळं स्वतः करावं लागतं. मला आठवतंय जेव्हा मी अमेरिकेत पहिल्यांदा किराणा सामान खरेदी करायला गेले होते तेव्हा सगळ्या नव्या गोष्टी पाहून माझं हृदय खूप धडधडत होतं. पण नंतर, मला ती सगळी कामं खूप आवडू लागली.” असं माधुरी दीक्षितने सांगितलं.