माधुरी दीक्षित सध्या तिच्या ‘मां बहन’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. यामध्ये तिने रेखा ही प्रमुख भूमिका साकारली आहे. यातील तिच्या अभिनयाचं आणि चित्रपटाचं प्रेक्षक आणि समीक्षकांकडून कौतुक होत आहे. यामध्ये महिलांना केवळ त्यांना हवं तसं आयुष्य जगत असल्याने समाजातील लोकांच्या टीकेला सामोरं जावं लागतं हे दाखवलं आहे.
समाजामध्ये जसं महिलांबद्दल पटकन टीका केली जाते, मतं बनवली जातात. तसंच मनोरंजनविश्वातही महिला कलाकारांच्या निर्णयांवर, वागणुकीवर आणि दिसण्यावर सतत टीका होत असते. अशातच आता माधुरीने न्यूज १८शी संवाद साधताना करिअरच्या सुरुवातीला तिलासुद्धा अशा गोष्टींचा सामना करावा लागल्याचं म्हटलं आहे.
माधुरीला आलेला वाईट अनुभव
माधुरी म्हणाली, “जेव्हा समाजातील अनेक लोक तुम्हाला ओळखत असतात. तेव्हा अर्थात तुमच्याबद्दल ती अशी आहे, ती तशी आहे अशा चर्चा होणार. जेव्हा मी सुरूवात केली होती तव्हा मला मी खूप बारीक आहे. हिला काहीतरी खायला द्या असं म्हटलं जायचं. अशा गोष्टींवरुन लोक खूप पटकन तुमच्याबद्दल चर्चा करू लागतात.”
माधुरी पुढे याबद्दल म्हणाली, “तुम्ही वजन घटवलं तरी तुमच्याबद्दल बोललं जाणार आणि वजन वाढलं तरीसुद्धा बोलणार. भारतात जेव्ही कधी तुम्ही कोणाला भेटता तेव्हा ते आधी हेच म्हणतात की अरे ही किती जाड झाली आहे, ही किती बारीक झाली आहे.”
माधुरी म्हणाली, “त्या काळात सोशल मीडिया आणि ट्रोलिंग अशा गोष्टी नसल्यामुळे अशा टीका-टिप्पण्यांना सामोरं जाणं तुलनेने सोपं होतं. पण अशा गोष्टी फार मनावर न घेता त्याकडे दुर्लक्ष करायला शिकलं पाहिजे. आज जसं लोक मतं व्यक्त करतात, तशी मतं तेव्हाही होती. मात्र, त्यावेळी सोशल मीडिया नसल्यामुळे ती आपल्यापर्यंत पोहोचत नव्हती.”
याबाबत बोलताना माधुरीने पुढे सांगितलं की, अशा सततच्या टीकेचा सामना करण्यासाठी स्वतःवर प्रेम करणं आणि स्वतःवर विश्वास ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. अभिनेत्री म्हणाली, “आज सोशल मीडियामुळे लोक काहीही बोलू शकतात. पण अशा गोष्टींकडे जास्त लक्ष न देता आपण जे काम करतो, ज्याची आपल्याला आवड आहे आणि जे करताना आनंद मिळतो त्यावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वतःवर प्रेम करायला शिकलं पाहिजे.”
