Madhuri Dixit and Meenakshi Sheshadri Rivalry: ८० आणि ९० ची लोकप्रिय अभिनेत्री म्हणून मीनाक्षी शेषाद्री ओळखली जाते. ‘दामिनी’, ‘घातक’, ‘बडे घर की बेटी’, ‘जुर्म’, ‘आवारगी’, ‘औरत तेरी यही कहानी’, ‘माँ बेटी’, ‘यह रात फिर ना आएगी’ अशा अनेक चित्रपटांतील मीनाक्षी शेषाद्री यांच्या भूमिका गाजल्या.

याच काळात माधुरी दीक्षितदेखील विविध भूमिका आणि चित्रपटांतून लोकप्रिय ठरली. तिला धकधक गर्ल म्हणून ओळखले जाऊ लागले. ‘राम लखन’, ‘प्रेम प्रतिज्ञा’, ‘त्रिदेव’, ‘महासंगम’, ‘किशन कन्हैया’, ‘जमाई राजा’, ‘देवदास’, ‘हम आपके है कौन’, ‘हम तुम्हारे है सनम’, ‘घरवाली बाहरवाली’, ‘मृत्युदंड’ अशा अनेक चित्रपटांतून अभिनेत्रीने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले. दोघींचीही बॉलीवूडमधील लोकप्रियता मोठी होती. माध्यमे आणि प्रेक्षकांकडून त्यांची अनेकदा एकमेकांशी तुलना केली जायची.

याबरोबरच या दोघींमध्ये स्पर्धा असल्याचेदेखील म्हटले जायचे. मात्र, मीनाक्षी यांनी या चर्चा खोट्या असल्याचे वेळोवेळी सांगितले. दोघींची वेगळी ओळख आहे. तसेच, त्यांच्यात परस्पर आदर असल्याचे त्यांनी म्हटले.

Award Banner

या दोन्ही अभिनेत्रींनी १९८६ साली प्रदर्शित झालेल्या ‘स्वाती’ या चित्रपटात एकत्र काम केले होते. क्रांती कुमार यांनी हा रोमँटिक चित्रपट दिग्दर्शित केला होता. चित्रपटात मीनाक्षी शेषाद्री यांनी प्रमुख भूमिका साकारली होती; तर माधुरी दीक्षितने मीनाक्षी यांच्या सावत्र बहिणीची भूमिका साकारली होती. मीनाक्षी यांच्या शास्त्रीय नृत्याचे कौतुक झाले, तर माधुरीने तिच्या भूमिकेतून लक्ष वेधले.

“मी कधीच माधुरीसारखी…”

मीनाक्षी शेषाद्री व माधुरी दीक्षित यांच्यातील मतभेदांची चर्चा टिनू आनंद यांच्या ‘शनाख्त’ चित्रपटाच्या कास्टिंगदरम्यान झाली होती. सुरुवातीला या चित्रपटात मुख्य भूमिकेसाठी डिंपल कपाडिया यांची निवड करण्यात आली होती, तर मीनाक्षी दुय्यम भूमिकेत होत्या. मात्र, मानधनाच्या कारणामुळे डिंपल यांनी नकार दिल्यानंतर मुख्य भूमिकेसाठी माधुरी दीक्षितची निवड झाली आणि मीनाक्षी यांची भूमिका दुय्यम ठरली. या गोष्टीवर नाराज होऊन मीनाक्षी यांनी माधुरीबरोबर काम करण्यास नकार दिला असे म्हटले जाते, ज्यामुळे दोघींमध्ये तणाव निर्माण झाला. शेवटी चित्रपटाचे शूटिंग थांबवण्यात आले. त्यानंतर या दोघी अभिनेत्री कधीही एकत्र स्क्रीनवर दिसल्या नाहीत.

एकदा बॉम्बे टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत मीनाक्षी शेषाद्रीने माधुरी दीक्षितबरोबर होणाऱ्या तुलनेबाबत वक्तव्य केले होते. अभिनेत्री म्हणालेली, “मी कधीच माधुरीसारखी होऊ शकत नाही, माधुरीसुद्धा माझ्यासारखी असूच शकत नाही, आमच्यात कोणतीही स्पर्धा नाही.”

दरम्यान, सध्या मीनाक्षी शेषाद्री अभिनय क्षेत्रापासून दूर असल्याचे पाहायला मिळते. मात्र, त्या सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येतात; तर माधुरी दीक्षित विविध चित्रपट, सोशल मीडिया, रिअॅलिटी शो या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येते.