Madhuri Dixit KBC Interview : बॉलीवूडची ‘धक धक गर्ल’ माधुरी दीक्षितने सिनेविश्वाचे ९० चे दशक गाजवले आहे. माधुरीने अदा, सौंदर्य, नृत्य आणि अभिनयाद्वारे यशाचे शिखर गाठले. सामान्य मराठी कुटुंबातील या मुलीने ग्लॅमरच्या दुनियेत अशी छाप पाडली की, त्याची जादू आजही कायम आहे. माधुरी दीक्षित लवकरच कोण होणार करोडपती हा शो घेऊन प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. नुकतीच ती अमिताभ बच्चन यांच्या कौन बनेगा करोडपतीमध्ये सहभागी झाली होती. यावेळी तिने आईने दिलेला मोलाचा सल्ला याबद्दल माहिती दिली आहे.
अमिताभ बच्चन यांच्या वाढदिवसानिमित्त केबीसीमधील ‘एबी बर्थडे वीक स्पेशल’ एपिसोडमध्ये माधुरी दीक्षित सहभागी झाली. यावेळी तिने सिनेविश्वातील सुरुवातीच्या दिवसांच्या आठवणी सांगताना आई स्नेहलता दीक्षित यांच्या आठवणींना उजाळा दिला. अगदी लहान वयामध्ये बॉलीवूडमध्ये करिअरला सुरुवात करताना झालेली टीका, स्वतःबद्दल वाटणारी शंका आणि या क्षेत्रातील दबाव, याला समोर जाण्यासाठी आईने सांगितलेला महत्त्वपूर्ण सल्ला, माधुरी दीक्षितने शेअर केला आहे.
आईबद्दल माधुरी दीक्षितने सांगितल्या आठवणी
यावेळी अमिताभ बच्चन यांनी विचारले, “माधुरीजी, ज्यांना तुम्ही ‘आई’ म्हणता, त्यांच्याकडून तुम्ही खूप काही शिकला आहात किंवा त्यांच्याकडून तुम्हाला असं काही मिळालं आहे का?” यावर माधुरी म्हणाली, “माझ्याकडे असणारी कोणीतीही कला असो, क्रिएव्हिटी किंवा नृत्य असो, हे सगळं मला आईकडूनच मिळालं आहे. माझी आई खूप खंबीर होती. जशा तुमच्या आई खंबीर होत्या, तशीच माझी आईसुद्धा होती. दोघींमध्येही प्रचंड मनोबल होते.”

माधुरीने पुढे सिनेविश्वामध्ये सुरुवातीच्या काळात आलेल्या अनुभवांचा उल्लेख करीत खूप कमी वयाचे असताना काम सुरू केल्याबद्दल सांगितले. तसेच त्यावेळी मनाने खूपच हळवी असल्याचेही सांगितले. माधुरी म्हणाली, “जेव्हा मी या क्षेत्रात आले, तेव्हा मी खूप लहान होते. त्यामुळे कोणी मला काही बोललं, तर मला खूप वाईट वाटायचं आणि मी घरी जाऊन निराश होऊन बसायचे. त्यावेळी होणारी टीका आणि नकारात्मक बोलण्याचा माझ्यावर खूप परिणाम होत होता; पण माझी आई मला नेहमी, मानसिकदृष्ट्या खंबीर होण्यासाठी प्रोत्साहन द्यायची.”

पुढे माधुरी दीक्षित म्हणाली, “आई मला नेहमी एक सल्ला द्यायची की, इतरांच्या मतांमुळे स्वतःच्या निर्णयांवर परिणाम होऊ देऊ नकोस. इतकी कमजोर होऊ नकोस आणि कोणाचंही ऐकू नकोस. तुला हे करायचं आहे ना, मग करून दाखव. काम करीत राहा आणि खूप प्रामाणिकपणे काम करीत राहा. लोकांना ज्या गोष्टी नकारात्मक वाटत आहेत, त्या यश मिळाल्यानंतर सकारात्मक वाटू लागतात.”
