Madhuri dixit on Rekha: बॉलीवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षित सध्या चर्चेत आहे. लवकरच ती ‘माँ बहन’ या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा सिनेमा ‘नेटफ्लिक्स’ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात माधुरी दीक्षितबरोबर तृप्ती डिमरी, धरना दुर्गा, रवी किशन हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकांत दिसणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून हे कलाकार विविध मुलाखतींतून भेटीस येत आहेत. त्यांनी केलेली वक्तव्ये लक्ष वेधून घेत आहेत. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत माधुरी दीक्षितने रेखा यांच्याबद्दल वक्तव्य केले आहे. रेखा यांच्याबद्दल माधुरी दीक्षित नेमकं काय म्हणाली हे जाणून घेऊ…
“रेखा यांच्याबद्दल मी काय बोलू?”
माधुरीने नुकतीच ‘फिल्मीग्यान’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत ती रेखा यांच्याबद्दल म्हणाली, “रेखा यांच्याबद्दल मी काय बोलू? त्यांच्या अदा, त्यांचे हावभाव खूप छान असतात. त्या ज्या पद्धतीने इतरांना भेटतात, ते सगळंच कौतुक करण्यासारखं आहे. मी त्यांच्याबरोबर खूप कमी काम केले आहे, पण मी त्यांना ओळखते.
पुढे ती म्हणाली, “जेव्हा मी ‘डान्स दीवाने’ शोमध्ये जज म्हणून काम करत होते, त्यावेळी त्या शोमध्ये आल्या होत्या. त्या खूप प्रतिभावान आहेत. त्या खूप चांगल्या व्यक्ती आहेत. एक उत्तम अभिनेत्री आहेत. मला त्यांचे कौतुक वाटते, मी त्यांची खूप मोठी प्रशंसक आहे. कायमच त्या खूप सकारात्मक असतात”, असे म्हणत माधुरीने रेखा यांचे कौतुक केले.
रेखा व माधुरी यांनी आतापर्यंत फक्त एकाच सिनेमात एकत्र काम केले आहे. ‘लज्जा’ असे या सिनेमाचे नाव आहे. २००१ मध्ये हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. यामध्ये रेखा यांनी रामदुलारी ही भूमिका साकारली होती, तर माधुरी दीक्षितने जानकी ही भूमिका साकारली होती. राजकुमार संतोषी यांनी या सिनेमाचे दिग्दर्शन केले होते. या चित्रपटाशिवाय त्यांनी कोणत्याही सिनेमात स्क्रीन शेअर केली नाही.
रेखा व माधुरी दीक्षित दोघीही बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री आहेत. रेखा यांचे ‘खुबसुरत’, ‘कलयुग’, ‘खून भरी माँग’, ‘मुकद्दर का सिंकदर’, ‘सिलसिला’ असे अनेक सिनेमे गाजले. तसेच माधुरीचे ‘अबोध’, ‘प्रेम प्रतिज्ञा’, ‘परिंदा’, ‘दयावान’, ‘हम आपके है कोन’ असे अनेक सिनेमे गाजले आहेत.
रेखा सध्या अभिनयात सक्रिय नाहीत. मात्र, विविध चित्रपटांच्या स्क्रीनिंग, कलाकारांच्या पार्टीला त्या आवर्जून हजर असतात. त्यावेळचे त्यांचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतात. त्यांची स्टाईल, बोलणे यामुळे लोकांना त्या आजही प्रचंड आवडतात. त्यांचा चाहतावर्ग मोठा आहे.
दरम्यान, माधुरी दीक्षित सध्या हटके भूमिका, अनोखा अंदाज, विविध छटा असलेल्या भूमिका साकारत आहे; त्यामुळे तिच्या नवनवीन भूमिकांची चाहते आतुरतेने वाट पाहतात. माधुरीची प्रमुख भूमिका असलेला ‘माँ बहन’ सिनेमा ४ जून २०२६ ला प्रदर्शित होणार आहे.
