माधुरी दीक्षितने तिच्या करिअरमध्ये अनेक स्टार्सबरोबर काम केलं. माधुरीने ९० च्या दशकात अनिल कपूर व जॅकी श्रॉफ यांच्याबरोबर बरेच चित्रपट केले. माधुरीची या दोघांबरोबरची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप आवडली होती. माधुरीने हे दोन्ही अभिनेते सेटवर वेळेवर यायचे असं म्हणत त्यांचं कौतुक केलं.
“मी देवाचे आभार मानते, की मी अशा लोकांबरोबर काम केलं जे नेहमी वेळेवर यायचे. हे दोन अभिनेते म्हणजे अनिल कपूर आणि जॅकी श्रॉफ होय. गोविंदा सेटवर उशीरा यायचा, असं माझ्याबरोबर कधीच घडलं नाही,” असं माधुरी दीक्षित मिड-डेला दिलेल्या मुलाखतीत म्हणाली. गोविंदा सेटवर उशीरा यायचा असं म्हटलं जातं. त्याच्याबरोबर काम करण्याचा अनुभव कसा होता, हे विचारलं असता माधुरीने हे उत्तर दिलं.
माधुरी दिक्षीतने अनिल कपूबरोबर तेजाब, किशन कन्हैया आणि खेल, बेटा, टोटल धमाल, पुकार या हिट चित्रपटांमध्ये काम केलं. तर जॅकी श्रॉफबरोबर त्रिदेव, खलनायक, देवदासमध्ये काम केलं होतं. गोविंदाबरोबर माधुरीने पाप का अंत, इज्जतदार, महा संग्राम, बडे मियां छोटे मियां हे चित्रपट केले. बडे मियां छोटे मियांमध्ये अमिताभ बच्चन देखील होते.
सेटवर उशीरा येण्याबद्दल गोविंदा म्हणाला…
मुकेश खन्ना यांना अलीकडेच दिलेल्या मुलाखतीत गोविंदाने सेटवर नेहमी उशिरा येण्याच्या आरोपावर स्पष्टीकरण दिलं. “मी सेटवर कधीही वेळेवर पोहोचत नव्हतो. मी दिलीप कुमार साहेबांचा फॉलोअर होतो. मी उशिरा जायचो नाही. पण जोपर्यंत माझा मूड निट व्हायचा नाही तोवर जायचो नाही, त्यासाठी मला थोडा वेळ लागायचा,” असं गोविंदा म्हणाला.
दिलीप साहेबांनी २५ चित्रपट सोडायला लावले
गोविंदाने दिवंगत दिग्गज अभिनेते दिलीप कुमार यांच्याबरोबरची एक आठवण सांगितली. “माझे एकाच वेळी ४०-४९ चित्रपट सुरू असायचे. मी एका सेटवरून दुसऱ्या सेटवर प्रवास करायचो. मी अशिक्षित माणूस या फिल्म इंडस्ट्रीतल्या लोकांच्या तावडीत सापडलो. जर मला दिलीप कुमार साहेब भेटले नसते, तर या लोकांनी मला जास्त काम करायला लावून माझा जीव घेतला असता. दिलीप साहेबांनी मला जवळपास २५ चित्रपट सोडायला लावले. मी दिलीप कुमार साहेबांना म्हणालो, ‘मला हे पैसे परत करावे लागतील.’ ते मला म्हणाले, ‘मी तुला पैसे उसने देईन, पण हे चित्रपट सोडून दे,’” असं गोविंदा म्हणाला.
गोविंदाने एकाच वेळी बरेच चित्रपट साईन केले होते, त्यामुळे त्याला उशीर व्हायचा. याचा परिणाम इतर कलाकारांवर व्हायचा, त्यामुळे सर्वजण त्याला अनप्रोफेशनल म्हणू लागले होते, असं धुरंधर फेम राकेश बेदी स्क्रीनशी बोलताना म्हणाले.
