Madhuri Dixit : अभिनेत्री माधुरी दीक्षित सध्या तिच्या ‘मिसेस देशपांडे’ या सीरिजमुळे चर्चेत आहे. यादरम्यान दिलेल्या एका मुलाखतीत अभिनेत्रीने ती स्वयंपाक करायला केव्हा शिकली? तिने डॉ. नेनेंसाठी कोणता खास पदार्थ बनवला होता आणि हा पदार्थ बनवल्यावर तिची कशी फजिती झाली होती याबद्दलचा एक गमतीशीर किस्सा सांगितला आहे.

माधुरी दीक्षित नुकतीच ‘खाने में क्या है’ या कार्यक्रमात सहभागी झाली होती. यावेळी अभिनेत्रीने असंख्य जुन्या आठवणींना उजाळा दिला. माधुरी दीक्षितने डॉ. नेनेंसाठी खास कोळंबी मसाला ही डिश बनवली होती. पण, यावेळी स्वयंपाक करताना एक मजेशीर किस्सा घडला होता.

याबद्दल माधुरी सांगते, “स्वयंपाक करताना माझा सुरुवातीला फार गोंधळ व्हायचा. पण, माझ्या नवऱ्याने कधीच कोणतीही तक्रार केली नाही.”

Award Banner

अभिनेत्री पुढे म्हणाली, “अमेरिकेत प्री-कूक कोळंबी मिळते… म्हणजे ती कोळंबी आधीच थोडीफार शिजवलेली असते. ही गोष्ट तेव्हा मला खरंच माहिती नव्हती. मी एकदा कोळंबी मसाला बनवायचं असं ठरवलं. मसाला शिजल्यावर मी ग्रेव्हीमध्ये कोळंबी घातली, याची रेसिपी मी पुस्तकात सुद्धा नीट वाचली होती. पण, नेमकं उलटंच घडलं.”

“अमेरिकेत प्री-कूक कोळंबी मिळत असल्याने हा सगळा गोंधळ झाला होता. कोळंबी जास्त शिजली आणि ती पूर्ण रबरासारखी झाली होती. त्यामुळे डॉ. नेने जेवताना ती कोळंबी नीट गिळूही शकत नव्हते…ओव्हरकूक होऊन ती सगळी कोळंबी रबरासारखी झाली होती. पण, माझा नवरा शेवटपर्यंत काहीच बोलला नाही, त्याने हसतमुखाने सगळं खाल्लं…त्यांनी पहिला घास खाल्ल्यावर मला ‘खूप छान जेवण झालंय’ असं सांगितलं. त्यानंतर जेव्हा मी खाऊन पाहिलं तेव्हा माझं असं झालं…तुम्ही याला छान कसं काय म्हणू शकता? पण, त्यावेळी राम म्हणाले होते…तू पहिल्यांदाच कोळंबी बनवलीस…खरंच चांगला प्रयत्न केलास” असा किस्सा माधुरीने सांगितला.

वयाच्या १६ व्या वर्षी माधुरीने सिनेविश्वात काम करण्यास सुरुवात केली. त्यामुळे पारंपरिक स्वयंपाक, जेवणातील विविध पदार्थ या सगळ्या गोष्टी शिकण्यासाठी तिला वेळ मिळाला नव्हता. तिला फक्त पोहे, अंडी, चपाती हे पदार्थ बनवता यायचे. पण, डॉ. नेने उत्तम जेवण बनवतात असं माधुरीने तिच्या अनेक मुलाखतींमध्ये सांगितलं आहे.