Madhuri Dixit & Karan Johar : माधुरी दीक्षितने करिअरच्या शिखरावर असताना डॉ. श्रीराम नेनेंशी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. या दोघांचा विवाहसोहळा कॅलिफोर्निया येथे १७ ऑक्टोबर १९९९ रोजी पार पडला. ९० च्या दशकापासून ‘धकधक गर्ल’चा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे माधुरीच्या लग्नाची बातमी समोर आल्यावर अनेकांचे हार्टब्रेक झाले होते. लग्नानंतर माधुरी आपल्या पतीसह अमेरिकेत राहायला गेली.
बॉलीवूडवर अधिराज्य गाजवणारी ‘धकधक गर्ल’ मध्यंतरीची काही वर्षे इंडस्ट्रीपासून दूर होती. २०११ मध्ये माधुरी तिचे पती व कुटुंबासह भारतात परतली. काही वर्षांपूर्वी तिने अभिनेत्री जुही चावलाबरोबर करण जोहरच्या शोमध्ये उपस्थिती लावली होती. यावेळी करणने तिला, “तू एखाद्या हँडसम हिरोबरोबर लग्न का नाही केलंस?” असा प्रश्न विचारला होता. यावर माधुरीने जे उत्तर दिलं होतं; ज्याचं आजही सर्वत्र कौतुक केलं जातं. आज डॉ. श्रीराम नेने यांच्या ५९ व्या वाढदिवसानिमित्त हा खास किस्सा जाणून घेऊयात…
२०१४ मध्ये माधुरी दीक्षित आणि जुही चावला या दोघी करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’ या शोमध्ये सहभागी झाल्या होत्या. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. यावेळी करणने या दोघींना, तुम्ही आजवर अनेक टॉपच्या अभिनेत्यांबरोबर काम केलेलं आहे. मग, तुम्ही त्यापैकी एखाद्या हँडसम हिरोशी लग्न का नाही केलं? असा प्रश्न विचारला.
करणचा प्रश्न ऐकून माधुरी गोड हसली आणि म्हणाली, “मी आतापर्यंत सलमान खान, शाहरुख खान, आमिर खान या सगळ्यांबरोबर काम केलेलं आहे. पण, मी यापैकी कोणाकडेच त्या दृष्टीने पाहिलं नाही. ते सगळे माझे सहकलाकाराच होते. पण, माझा नवरा…माझ्यासाठी तोच खरा हिरो आहे. त्याच्या व्यतिरिक्त आता मी कोणाकडेच हिरो म्हणून पाहत नाही,” ‘धकधक गर्ल’च्या या उत्तराने सर्वांची मनं जिंकून घेतली. अगदी शेजारी बसलेल्या जुहीने सुद्धा माधुरीच्या उत्तराचं कौतुक केलं होतं.
तर, जुही चावला करणच्या प्रश्नाचं उत्तर देत म्हणाली होती, “मला आजवर मी ज्यांच्याबरोबर काम केलंय त्या सगळ्या हिरोंचा आदर आहे. पण, मला वैयक्तिक आयुष्यात या क्षेत्रातला जोडीदार नको हवा होता. जोडीदारांचे स्वभाव आणि क्षेत्र वेगवेगळं हवं असं माझं मत आहे. माझ्या नवऱ्याने पहिल्यापासूनच माझी खूप काळजी घेतलीये.” जुही चावलाने १९९५ मध्ये बिझनेसमन जय मेहतांशी लग्नगाठ बांधली आहे.

