Madhuri Dixit reveals secret of fitness: माधुरी दीक्षित सध्या तिच्या ‘मां बहन’ सिनेमामुळे चर्चेत आहे. ४ जून २०२६ ला रोजी हा सिनेमा प्रदर्शित झाला आहे. नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा सिनेमा प्रदर्शित झाला आहे. विशेष म्हणजे माधुरी दीक्षितचा हा सिनेमा नेटफ्लिक्सवर ट्रेंड करीत होता. आता अभिनेत्री तिच्या वक्तव्यामुळे चर्चेत आहे.
माधुरी दीक्षितने नुकतीच ‘नवभारत टाइम्स’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने ट्रोलिंगवर वक्तव्य केले. लोक विविध गोष्टींवरून जज करतात, त्याबद्दल तिने वक्तव्य केले आहे. ती नेमकं काय म्हणाली आहे, ते जाणून घेऊ…
ट्रोलिंगबद्दल माधुरी दीक्षित काय म्हणाली?
माधुरी दीक्षित म्हणाली, “तुम्ही पडद्यावर दिसत असाल किंवा तुम्ही इतर कोणत्याही प्रोफेशनमध्ये असाल तरी लोक तुम्हाला जज करतातच. समाजातील लोक तुम्हाला जज करतात आणि ज्या महिला सिंगल असतात, त्यांना मोठ्या प्रमाणात जज केले जाते. म्हणजे ती कामावरून उशिरा घरी आली, लोक तिच्यावर कमेंट करतात की, ही इतक्या उशिरा घरी आली आहे.”
पुढे ती म्हणाली, “आमच्याही प्रोफेशनमध्ये अशा प्रकारे जज केलं जातं. आता अमुक ही अभिनेत्री आई झाली आहे, तर ती आता का काम करीत आहे किंवा डान्स करण्याचं हे वय आहे का? अशा अनेक कमेंट्स केल्या जातात, ज्यांचा सामना करावा लागतो. मात्र, लोक जज करीत असले तरी ज्या गोष्टीमुळे तुम्हाला आनंद होतो, ती गोष्ट तुम्ही केली पाहिजे, असं माझं मत आहे. लोकांना इतरांना जज करून त्यांना आनंद होतो; परंतु आपण स्वत:ला आनंदी ठेवणं हे आपलं काम आहे.”
वजन व वयावरून अनेकांना सोशल मीडियावर अनेकदा ट्रोल केले जाते, यावर माधुरी दीक्षित म्हणाली, “वयानुसार बदल तर होणारच आहेत. चेहरा, शरीर बदलेल. पण, मी पुन्हा तेच म्हणेन की, लोक काहीतरी म्हणतच राहणार आहेत, ते त्यांचे कामच आहे. (कुछ तो लोग कहेंगे, लोगों का काम है कहना) जे तुम्हाला आनंद देतं ते करा. समजा, जर मला डान्स करायला आवडत असेल, तर मी ते करेन. कारण- त्यामुळे मला आनंद मिळतो. तुम्ही लोकांच्या मतांनुसार तुमचं आयुष्य जगू शकत नाही. तुमचं आयुष्य तुमच्या पद्धतीनं जगा, लोक बोलतच राहतील. कधी कधी लोक असे का बोलत आहेत याचा विचार करून वाईट वाटते; पण त्यांचे म्हणणे इतके गांभीर्याने घेऊ नका की, त्याचा तुमच्या आयुष्यावर परिणाम होऊ लागेल.
माधुरी दीक्षितच्या फिटनेसचे काय आहे सिक्रेट?
अभिनेत्री ५९ वर्षांची आहे; पण आजही ती अगदी फिट आहे. तिच्या फिटनेसबद्दल ती म्हणाली, “मी खूप शिस्तप्रिय आयुष्य जगते. डाएटची काळजी घेते, व्यायाम करते. मी डान्स करते, त्यातून माझा व्यायाम होतो. याबरोबरच वेळेत झोपणे महत्त्वाचे आहे. मला कोणत्याच वाईट सवयी नाहीत. या सगळ्या गोष्टी फिटनेसमध्ये महत्त्वाच्या आहेत.”
दरम्यान, माधुरी विविध भूमिकांतून प्रेक्षकांच्या मनावर पुन्हा एकदा राज्य करीत आहे. तिचा हा अनोखा अंदाज प्रेक्षकांच्या मनावर राज्य करीत आहे.
